भारत-बांगलादेश सीमेवर १०० हून अधिक जणांचे सैनिकांवर सशस्त्र आक्रमण  

  • बंदुका हिसकावून पळवल्या !

  • २ सैनिक घायाळ

बेरहामपूर (बंगाल) – भारत आणि बांगलादेश यांच्या बंगालमधील सीमेवर २६ फेब्रुवारी या दिवशी बांगलादेशी गुंड आणि नागरिक यांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण केले. बेरहामपूर सेक्टरमधील निर्मलचर पोस्ट ३५ बटालियनच्या भागात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. १०० हून अधिक असणार्‍या या बांगलादेशींकडे धारदार शस्त्रे होती. त्यांनी सैनिकांकडील बंदुका हिसकावून घेऊन बांगलादेशात पलायन केले. त्यांच्या आक्रमणात २ सैनिक घायाळ झाले. याविषयी सीमा सुरक्षा दलाने माहिती दिली आहे. या घटनेविषयी सीमा सुरक्षा दलाने ‘बॉर्डर गार्ड्स बांगलादेश’पुढे सूत्र उपस्थित केले आहे. तसेच या प्रकरणी ध्वज बैठकही बोलावली आहे.

बेहरामपूर भागातील भारतीय शेतकर्‍यांनी बांगलादेशी शेतकरी पिकांची नासधूस करत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाने त्यांच्या सुरक्षेसाठी या भागात तात्पुरती चौकी स्थापन केली होती. यापूर्वीही सीमेवर तस्कर आणि घुसखोर यांच्याकडून सैनिकांवर आक्रमणे झालेली आहेत.

संपादकीय भूमिका 

सैनिकांवर शस्त्रांद्वारे आक्रमण होत असतांना त्यांना गोळीबार करण्याचा आदेश नाही का ? सैनिकांना मारहाण करून त्यांच्याकडील बंदुका हिसकावून नेण्यात येत असतील, तर सीमेवर सैनिकांना तैनात तरी कशाला करण्यात आले आहे ?