कांदोळी येथील ग्रामसभा
म्हापसा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – कांदोळी ग्रामपंचायतीच्या २६ फेब्रुवारीला झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून वारसास्थळ असलेल्या आग्वाद कारागृह संग्रहालयातील व्यवसाय, पर्यटकांसाठी चालू करण्यात आलेली हेलिकॉप्टर फेरी सेवा आणि कांदोळी येथील बांधाचे विस्तारीकरण याला विरोध करण्यात आला.
पंचायतीतील एका नागरिकाने कांदोळी येथील बांधावर अवैध धंदे चालत असून पंचायतीने स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर सरपंचांनी ‘या बांधावर पहाणी करण्यात आली असून याविषयी पुढील कारवाई करण्यात येईल’, असे सांगितले. आग्वाद येथे चालू करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर सेवेविषयी ग्रामस्थांचे म्हणणे होते की, जागतिक वारसा असलेल्या ‘आग्वाद’ या स्मारकाची सुरक्षितता महत्त्वाची आहे.
जर हेलिकॉप्टर फेरीमध्ये काही दुर्घटना घडल्यास या स्मारकाला धोका पोचू शकतो. ग्रामस्थांचे हे म्हणणे गोवा पर्यटन विकास महामंडळाला कळवण्यात येईल, असे सरपंचांनी सांगितले. या ग्रामसभेत पंचायत क्षेत्रात अवैधपणे कॅसिनो चालवण्यात येत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. ‘या कॅसिनोंना पंचायतीने अनुज्ञप्ती दिली आहे का ?’ असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारल्यावर तशी काही अनुज्ञप्ती दिली नसल्याचे सरपंचांनी सांगितले.