गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी दुर्गप्रेमींनी एकत्र यावे ! – समस्त दुर्गप्रेमी संघटनांचे आवाहन

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी हिंदूंची संघटनशक्ती दाखवण्याचा पुणे येथील बैठकीत निर्धार !

पुणे, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीने ३ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता मुंबई येथे राज्यव्यापी मोर्च्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी सर्व दुर्गप्रेमी हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र यावे, आज आपण एकत्र आलो तरच महामंडळ स्थापन होईल आणि गडांचे संवर्धन होईल, असे आवाहन दुर्गप्रेमी संघटनांनी केले आहे. समस्त गड-दुर्ग प्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवप्रेमी यांची बैठक २४ फेब्रुवारी या दिवशी धायरी, पुणे येथे पार पडली. त्या बैठकीत वरील आवाहन करण्यात आले.

या बैठकीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे विद्याधरपंत नारगोलकर, ‘छत्रपती शिव शंभू सेवा ट्रस्ट’चे ओमकार मोहिते, समस्त हिंदु बांधव या संघटनेचे राजेश तनपुरे, ऋतुजा माने, अवचित मारुति ट्रेकिंग ग्रुप, तसेच ‘महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशन’ या संघटनेचे सदस्य मिलिंद अंबिके, रणरागिणी शाखेच्या कु. प्राची शिंत्रे यांच्यासह समस्त दुर्गप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी उपस्थित होते. या वेळी सर्व दुर्गप्रेमींनी संघटित होऊन हिंदूंची संघटनशक्ती दाखवण्याचा निर्धार केला.

गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी सर्व दुर्गप्रेमींनी एकत्र यावे ! – राजेश तनपुरे, समस्त हिंदु बांधव 

आतापर्यंत आपण गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी आंदोलने केली, मोर्चे काढले निवेदने दिली; पण त्यानंतरही शासनाकडून, पुरातत्व खात्याकडून म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. १ मासांपूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले; पण त्याचाही काहीच परिणाम झाला नाही. त्यासाठी काहीतरी ठोस निर्णय व्हावा; म्हणून सर्व दुर्गप्रेमींनी एकत्र यावे.

गडांचे रक्षण करणे हे आपले नैतिक दायित्व ! – मिलिंद अंबिके, सदस्य, महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशन

‘महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशन’ ही आमची संघटना तरुणांसाठी सैनिकीकरणाचे विनामूल्य प्रशिक्षण देते. आमच्या संघटनेचा ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ला संपूर्ण पाठिंबा आहे. गडांचे रक्षण करणे, हे आपले नैतिक दायित्व आहे. त्यासाठी या महामोर्च्यात आपण सर्वजण सामील होऊया, असे ‘महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशन’चे सदस्य श्री. मिलिंद अंबिके यांनी सांगितले.