हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कृतीशील होण्याचा आर्णी (यवतमाळ) येथील धर्मप्रेमींचा निर्धार !
यवतमाळ, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु संस्कृती विश्वकल्याणचा विचार करते, सेवा, सुरक्षा, संस्कार करायला सांगते, हिंदु संस्कृती सत्त्वगुणप्रधान आहे; मात्र धर्माचरणाच्या अभावामुळे हिंदूंवर अनेक आघात होत आहेत; कारण हिंदु समाज विखुरलेला आहे, त्यामुळे हिंदु संस्कृती टिकवण्यासाठी सर्व हिंदु संघटनांनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राचे कार्य करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन नागपूर येथील गुरुसेवा संस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. भगीरथी महाराज यांनी केले. हिंदूंनी धर्माचरणी व्हावे आणि एकत्रित यावे, म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला; मात्र हिंदूंच्या सार्वजनिक उत्सवामध्ये अनेक अपप्रकार शिरले. सध्या हिंदु समाज देव, देश, धर्म यांचे कार्य करण्याऐवजी ‘रोटी, कपडा और मकान’ मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे जात, पात, पक्ष यांमधील मतभेद विसरून आदर्श अशा सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. २२ फेब्रुवारी या दिवशी रेणुका मंगल कार्यालय, आर्णी येथे पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ सन्मवयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी मार्गदर्शन केले, तसेच रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी जोशी यांनी ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ या विषयावर मार्गदर्शन केले. या सभेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, तसेच ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ या वेळी उपस्थित होते.
हिंदूंवरील आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – श्रीकांत पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती
भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन होऊन पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र बनले, तेव्हाच भारत हे हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. उलट या वेळी हिंदु महिलांवर असंख्य अत्याचार झाले. वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घालण्यात आला. तेव्हापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत, अल्पसंख्यांकांना त्यांच्या शाळांमधून त्यांचा धर्म शिकवण्याची मुभा मिळाली; मात्र बहुसंख्य हिंदूंना धर्मशिक्षणापासून दूर ठेवण्यात आले. भारतात कायदे बहुसंख्य हिंदूंना, तर फायदे अल्पसंख्यांना मिळत आहेत. हिंदूंवरील हे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी केले.