भाग्यनगर विश्‍वविद्यालयात एस्.एफ्.आय. आणि अभाविप यांच्या विद्यार्थ्यांमध्ये धूमश्‍चक्री !

८ विद्यार्थी घायाळ !

भाग्यनगर – येथील विश्‍वविद्यालयात साम्यवादी विचारसरणीची ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ अर्थात् ‘एस्.एफ्.आय.’ आणि ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) यांच्या विद्यार्थ्यांमध्ये धूमश्‍चक्री झाली. विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर ही घटना घडली. येथील दरवाजांच्या काही काचा फुटल्या असून विद्यार्थ्यांच्या सायकलींचीही तोडफोड करण्यात आली आहे. भाग्यनगर विश्‍वाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर ही घटना घडली आहे.

गुंडांवर कारवाई करा ! – अभाविप

या प्रकरणी अभाविपचे राष्ट्रीय सचिव हरिकृष्णा नगौथू म्हणाले की, आमच्या विद्यार्थ्यांवर धारदार चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. गुंडांवर कारवाई करून आम्हाला न्याय दिला गेला पाहिजे. या प्रकरणी अभाविपने एस्.एफ्.आयच्या विद्यार्थ्यांनी प्रथम अभाविपच्या आदिवासी विद्यार्थ्यांवर आक्रमण केल्याचा आरोप केला, तर एस्.एफ्.आय.ने अभाविपने प्रथम आक्रमण केल्याचा प्रत्यारोप केला.

संपादकीय भूमिका 

तेलंगाणामध्ये हिंदुद्वेषी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे या घटनेत एस्.एफ्.आय.चे विद्यार्थी दोषी आढळले, तरी त्यांच्यावर कदापि कारवाई होणार नाही, हे तितकेच खरे !