खलिस्तानची भावना कायम रहाणार असून तुम्ही ती दाबू शकत नाही !

  • खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह याचे विधान

  • कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नसल्याचेही केले स्पष्ट !

‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह

अमृतसर (पंजाब) – खलिस्तानची मागणी ही दुःख दूर करण्यासाठी केली जात आहे. ती आमच्या अस्तित्वासाठी आहे. खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही, असे विधान ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने ‘इंडिया टुडे’ नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘आम्ही कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाही. मला ठाऊक आहे की, हिंसा आम्हाला अधिक हानी पोचवेल. मी कोणत्याही भ्रमात नाही; मात्र मी कुणाला आम्हाला मारूही देणार नाही’, असेही त्याने या वेळी स्पष्ट केले.

मुलाखतीमध्ये अमृतपाल याने मांडलेली सूत्रे –

१. मी स्वतःला खलिस्तानचा प्रचारक समजत नाही. राष्ट्रवाद कोणतीही पवित्र गोष्ट नाही. लोकशाहीमध्ये वेगवेगळे विचार असले पाहिजे. ही अमृतपालची गोष्ट नाही.

२. मी हिंसक नाही. मी माझ्या अस्मितेचे बलिदान करणार नाही. माझ्या संदर्भातील गोष्टींचा अपप्रचार होत आहे. कुणी म्हणतो मी भाजपचा समर्थक आहे, तर कुणी म्हणतो पाकिस्तानचा. मी केवळ माझ्या गुरु ग्रंथसाहिबचा समर्थक आहे.

३. मला माझ्या संघटनेच्या व्यतिरक्त कुणी साथ देत नाही. मी कोणत्याही मीडिया ट्रायल’चा (माध्यमांकडून न्यायाधिशांच्या भूमिकेत राहून केलेल्या वार्तांकनाचा) भाग आहे.

४. १९८० च्या दशकातील खलिस्तानवादी जर्नेल भिंद्रनवाले याच्या संदर्भातील तुलनेविषयी अमृतपाल म्हणाले की, मी सामान्य पोशाख घालतो. तो भिंद्रनवाले याच्या पोषाखावर आधारित नाही.

संपादकीय भूमिका

  • ‘खलिस्तानवादी हिंसेचा मार्ग अवलंबणार नाहीत’, यावर कोण विश्वास ठेवणार ? पंजाबमधील अजानल पोलीस ठाण्यावर सहस्रो खलिस्तान समर्थकांच्या हातात बंदुका, तलवारी आणि लाठ्या या काही सत्याग्रह करण्यासाठी नव्हत्या. या शस्त्रांच्या धाकातून त्यांनी त्याच्या साथीदाराची सुटका करण्यास पोलिसांना भाग पाडले !
  • स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याची स्थिती काय झाली आहे, हे त्याच्या साहाय्याने खलिस्तानची मागणी करणार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे !