वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मिहानमध्ये १ लाख तरुणांना देणार रोजगार ! -नितीन गडकरी

नागपूर येथे नितीन गडकरी यांची मोठी घोषणा !

नितीन गडकरी

नागपूर – वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मिहानमध्ये (विमानतळ प्रकल्प) १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. १९ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की,

१. ३१ मार्च या दिवशी इन्फोसिसच्या नव्या प्रकल्पाचे भूमीपूजन होत आहे. त्यात ५ सहस्र तरुणांना रोजगार मिळणार आहे. ‘एच्.सी.एल्.’ आणि ‘टी.सी.एस्.’ यांनी यापूर्वी ७ सहस्र तरुणांना रोजगार दिला. आता ते ३० सहस्र तरुणांना रोजगार देणार आहेत.

२. मिहानमध्ये आतापर्यंत ८७ सहस्र ८९० जणांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे. खासदार म्हणून पुढील निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मिहानमध्ये १ लाख तरुणांना रोजगार देणार आहोत.

३. रोजगारनिर्मिती होऊन त्यासाठी उद्योग आले पाहिजेत. उद्योग आणि व्यापार वाढला, तर रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मितीच्या नवनवीन संधी शोधल्या पाहिजेत.

४. जिल्ह्यातील महालमध्ये जुन्या बाजारात ६०० महिला जुने कपडे गोळा करून विकतात. त्यांना शिलाई यंत्र, रफ्फू यंत्र आणि धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन) मिळाले, तर गरिबांना चांगले कपडे मिळतील. या महिलांना १ लाख रुपये कर्ज देणार आहोत. त्यासाठी ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’ने पुढाकार घेत या महिलांकडून अर्ज भरून घ्यावेत.

५. प्लास्टिकपासून क्रूड पेट्रोल काढण्याचा नवीन प्रकल्प मी चालू करत आहे. ३ मासांत प्रकल्प चालू होईल. हे पेट्रोल डिझेलमध्ये वापरता येईल. त्यावर ट्रक आणि बस चालू शकेल.

६. प्लास्टिक न जाळता ते विशिष्ट तापमानावर तापवायचे. मग ते वितळेल. ते ८० ते ८८ अंशांपर्यंत तापवले म्हणजे द्रव निघते. ते थंड केले की, त्यातून पेट्रोल मिळते.