नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिकदृष्ट्या हिंदु राष्ट्रच !

पुरी पीठाचे शंकाराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन

(सैद्धांतिक म्हणजे धार्मिक सिद्धांतांवर आधारित असलेले)

पुरी पीठाचे शंकाराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही दृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे, असे प्रतिपादन पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी राजधानी काठमांडू येथील जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिरात केले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शंकराचार्यांच्या हस्ते या मंदिरात भगवान शिवाची पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना केलेल्या मार्गदर्शनात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २००६ मधील यशस्वी आंदोलनानंतर वर्ष २००८ मध्ये नेपाळला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. याद्वारे येथील प्राचीन राजेशाही संपुष्टात आणण्यात आली. नेपाळमध्ये हिंदु धर्म बहुसंख्य, म्हणजे ८१ टक्क्यांहून अधिक आहेत. त्यामुळे नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्हीदृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे आणि मलाही तसेच वाटते.’’

या प्रसंगी शंकराचार्यांच्या हस्ते ८व्या शतकातील आध्यात्मिक प्रतीक असलेल्या आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

श्री पशुपतिनाथाच्या दर्शनासाठी भारतातून सहस्रो साधू नेपाळमध्ये !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान श्री पशुपतिनाथाच्या दर्शनासाठी भारतातून ३ सहस्र ५०० साधू, तर १ सहस्र नागा साधू नेपाळमध्ये आले आहेत. मंदिराकडून या साधूंसाठी विनामूल्य भोजन आणि निवास यांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे दर्शनासाठी भारतातून अन्यही नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत. त्यामुळे भाविकांची रीघ लागली होती. येथे सुरक्षेसाठी ७ सहस्र कर्मचारी आणि १० सहस्र स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आली होती.