पुणे – कोंढवा बुद्रुक परिसरातील सर्व्हे क्रमांक ६३ मध्ये विनाअनुमती झाडे तोडण्याचा प्रकार वृत्तपत्रातून उघड झाला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित वृक्षतोडीचा पंचनामा करून ‘अटरिया कन्स्ट्रक्शन’ आस्थापनाचे अनिल रेड्डी आणि धनंजय थिटे या दोघांविरोधात नोटीस बजावली आहे, अशी माहिती कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे हॉर्टिकल्चर मिस्त्री विजय नेवासे यांनी दिली.
कोंढवा परिसरात वाढलेली बांधकामे, सातत्याने येत असलेले बांधकाम प्रकल्प यांमुळे परिसरातील हरित क्षेत्रात मोठी घट झाली आहे. बांधकामासाठी अनेक ठिकाणी विनाअनुमती झाडे तोडली जात आहेत. हरित क्षेत्रात होत असलेली घट, महापालिकेची त्याला असणारी मूक संमती, प्रकल्प राबवणारे आणि शासनकर्ते यांचे संगनमत या सर्वांमुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होत आहे. बेकायदा वृक्षतोड करणार्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना शासनाने केल्या असल्या, तरी त्याकडे कानाडोळा होत आहे. वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातमीचा पाठपुरावा केल्याने कोंढवा बुद्रुक परिसरातील राजगृही रेसिडेन्सीलगत असलेल्या रिकाम्या जागेवरील वृक्षतोडीसंदर्भात वृक्षतोडीचा पंचनामा करून कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकाप्रशासनाचे दुर्लक्ष आणि कारवाईमध्ये होणारी दिरंगाई यांमुळेच बेकायदेशीर गोष्टींना ऊत आला आहे. वेळीच याला आवर घालणे आवश्यक आहे ! |