(म्हणे) ‘महाशिवरात्री साजरी करायची असेल, तर ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणावे लागेल !’ – खलिस्तान

ऑस्ट्रेलियातील हिंदूंना पाकिस्तानमधील खलिस्तानवाद्याकडून धमकी !

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याच्या घटनांनंतर आता खलिस्तानवादी हे मंदिरांना धमक्या देऊन भयाचे वातावरण निर्माण करू पहात आहेत. १७ फेब्रुवारी या दिवशी येथील प्रसिद्ध गायत्री मंदिराचे अध्यक्ष डॉ. जयराम आणि उपाध्यक्ष धर्मेश प्रसाद यांना एका खलिस्तानवाद्याने दूरभाष करून धमकावले.

‘ऑस्ट्रेलिया टुडे’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार डॉ. जयराम यांना पाकिस्तानच्या ननकाना साहिब येथून गुरु अवधेश सिंह नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. या वेळी तो म्हणाला की, तुम्हाला मंदिरात महाशिवरात्र साजरी करायची असेल, तर तुमच्या पुजार्‍याला सांगा की, ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हटल्याखेरीज महाशिवरात्र साजरी करू नये ! या वेळी त्याने हेही म्हटले की, १९ मार्च या दिवशी खलिस्तान जनमत संग्रह होणार असून त्यास तुम्ही समर्थन करायला हवे !

गेल्याच मासात मेलबर्न येथील श्री काली माता मंदिराच्या महिला पुजारी भावना यांनाही एका खलिस्तानवाद्याने संपर्क करून धमकावले होते. ४ मार्च या दिवशी मंदिरात होणार्‍या कार्यक्रमात एका कट्टर हिंदु गायकाला निमंत्रण देण्यात आल्याने त्याला कार्यक्रमात सहभागी करून घेतल्यास मंदिरावर आक्रमण करू, अशा प्रकारे धमकावण्यात आले होते.

संपादकीय भूमिका 

जगभरातील खलिस्तानवादी प्रवृत्ती भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याने भारत सरकारने पंजाबमधील खलिस्तानवादी संघटना नष्ट करण्यासह जगभरात जिथे-जिथे खलिस्तानवादी आहेत, तिथे-तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तेथील सरकारांना खडसवायला हवे !