अमेरिकेला भारतीय वंशाचे राष्ट्राध्यक्ष मिळण्याची शक्यता !

ट्रम्प यांच्याऐवजी निक्की हेली आणि बायडेन यांच्याऐवजी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीची शक्यता !

डावीकडून कमला हॅरिस आणि निक्की हेली

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठीची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर दावा केला आहे. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी ट्रम्प आणि निक्की यांच्यात लढत होणार आहे. दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि आताचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता असल्याने या पक्षाकडून सध्याच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतात. जर कमला हॅरिस आणि निक्की हेली या दोघीही उमेदवार ठरल्या, तर अमेरिकेच्या १९१ वर्षांच्या इतिहासात अमेरिकेला पहिला भारतीय वंशाचा राष्ट्राध्यक्ष मिळू शकेल.

ट्रम्प आणि बायडेन यांच्या उमेदवारीची शक्यता अल्प !

निक्की हेली आणि कमला हॅरिस यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; कारण अर्ध्याहून अधिक अमेरिकी नागरिकांची ट्रम्प आणि बायडेन या दोघांनाही पसंती नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर मासांमध्ये ‘हार्वर्ड सीएपीए-हॅरिस’ यांच्या सर्वेक्षणात, ६७ टक्के लोकांनी सांगितले की, बायडेन यांनी निवडणूक लढवू नये. ३३ टक्के लोकांनी त्यांना वाईट राष्ट्राध्यक्ष म्हटले. दुसरीकडे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५७ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांनी पुढील निवडणूक लढवू नये; मात्र बायडेन आणि ट्रम्प यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा उघडपणे घोषित केलेली आहे.