असात्त्विक (रिमिक्‍स) आणि सात्त्विक ‘ॐ नमः शिवाय ।’, हे नामजप ऐकल्‍यावर व्‍यक्‍तीवर होणारा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी केलेली वैज्ञानिक चाचणी !

असात्त्विक (रिमिक्‍स) आणि सात्त्विक ‘ॐ नमः शिवाय ।’, हे नामजप ऐकल्‍यावर व्‍यक्‍तीवर होणारा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘अलीकडे सर्वत्र ‘रिमिक्‍स’ पद्धतीची गाणी, भजने, मंत्र हे प्रकार पुष्‍कळच वाढले आहेत. ‘आधुनिक तंत्रज्ञान वापरून ‘मूळ स्‍वरूपातील विविध गीते, स्‍तोत्रे, मंत्र यांत संगणकीय ‘मेटॅलिक’ आवाज बनवणे (म्‍हणजे संगणकीय प्रक्रिया करून आवाज विकृत केला जाणे), भारतीय आणि पाश्‍चात्त्य वाद्यांची सरमिसळ करून मूळ संगीताचे नूतनीकरण करणे’, याला ‘रिमिक्‍स’ गीत’, असे म्‍हणतात. सध्‍या युवा पिढीमध्‍ये ‘रिमिक्‍स’ हा प्रकार अधिक प्रचलित झाला आहे. अशा प्रकारे समाजात ‘रिमिक्‍स’ पद्धतीचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजपही सिद्ध करण्‍यात आला आहे.

‘सध्‍याच्‍या काळानुसार नामजप कसा करायचा ?’, याचा अध्‍यात्‍मशास्‍त्रदृष्‍ट्या अभ्‍यास करून महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या संगीत समन्‍वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या मार्गदर्शनानुसार ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप ध्‍वनीमुद्रित केला आहे. ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने ‘रिमिक्‍स’ पद्धतीचा आणि काळानुसार भावपूर्ण केलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ या दोन नामजपांचा तुलनात्‍मकदृष्‍ट्या केलेला अभ्‍यास पुढे दिला आहे.

१. ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

२४.१.२०२१ या दिवशी ‘रिमिक्‍स’ पद्धतीचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप आणि ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी काळानुसार भावपूर्ण केलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप, हे दोन्‍ही नामजप ३ व्‍यक्‍तींना प्रत्‍येकी २० मिनिटे ऐकवले. ‘दोन्‍ही प्रकारचे नामजप ऐकल्‍यावर त्‍यांच्‍यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्‍यासण्‍यासाठी ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने एक चाचणी घेण्‍यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्.’ (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर) या उपकरणाचा उपयोग करण्‍यात आला. या उपकरणाद्वारे वस्‍तू, वास्‍तू किंवा व्‍यक्‍ती यांच्‍यातील नकारात्‍मक आणि सकारात्‍मक ऊर्जेची प्रभावळ मोजता येते. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१ अ. चाचणी क्र. १ – ‘रिमिक्‍स’ प्रकारातील ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप २० मिनिटे ऐकवणे

१ आ. चाचणी क्र. २ – सध्‍याच्‍या काळानुसार आणि संतांच्‍या मार्गदर्शनानुसार केलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप २० मिनिटे ऐकवणे

२.  वरील २ चाचण्‍यांच्‍या तुलनात्‍मक अभ्‍यासातून लक्षात आलेले निष्‍कर्ष !

अ. प्रयोगात सहभागी असलेल्‍या २ व्‍यक्‍तींमध्‍ये पूर्वी नकारात्‍मक ऊर्जा नव्‍हती; परंतु ‘रिमिक्‍स’ प्रकारचा ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप ऐकल्‍यावर त्‍यांच्‍यामध्‍ये नकारात्‍मक ऊर्जा निर्माण झालेली आढळली. या तुलनेत संतांच्‍या मार्गदर्शनानुसार आणि सध्‍याच्‍या काळानुसार नामजप करण्‍याच्‍या योग्‍य पद्धतीनुसार म्‍हटलेला ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप ऐकल्‍यावर नकारात्‍मक ऊर्जा आढळली नाही. (‘सध्‍याच्‍या काळानुसार कुठल्‍या प्रकारचा नामजप करायचा ?’, याचा अध्‍यात्‍मशास्‍त्रदृष्‍ट्या अभ्‍यास करून विविध नामजप महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाने ध्‍वनीमुद्रित केले आहेत.)

आ. ‘रिमिक्‍स’ प्रकाराचा ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप ऐकल्‍यावर प्रयोगात सहभागी झालेल्‍या तिन्‍ही व्‍यक्‍तींमधील सकारात्‍मक ऊर्जा न्‍यून झाली, तर संतांच्‍या मार्गदर्शनानुसार केलेला ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप ऐकल्‍यावर तिन्‍ही व्‍यक्‍तींमधील सकारात्‍मक ऊर्जा वाढलेली आढळली.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकरया लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

३. चाचण्‍यांतील निरीक्षणांचे अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विश्‍लेषण

३ अ. ‘रिमिक्‍स’ पद्धतीचा नामजप ऐकणे

३ अ १. ‘रिमिक्‍स’पद्धतीच्‍या नामजपातील रज-तमाच्‍या स्‍पंदनांमुळे ऐकणार्‍या व्‍यक्‍तींची बहिर्मुखता वाढून त्‍यांच्‍यात नकारात्‍मक ऊर्जा निर्माण होणे : ‘रिमिक्‍स’ पद्धतीमध्‍ये बर्‍याचदा मूळ आवाजाला संगणकीय प्रणाली वापरून ‘मेटॅलिक’ (विकृत) बनवण्‍यात येते. त्‍याचप्रमाणे अनेकविध देशी आणि विदेशी वाद्यांचे एकत्रीकरण करून त्‍याला पार्श्‍वसंगीतही दिले जाते. या सर्वांमुळे त्‍यातील मूळ सात्त्विकता नष्‍ट होऊन रज-तमाची स्‍पंदने वाढतात. त्‍यामुळे ‘रिमिक्‍स’ नामजप ऐकल्‍यावर वृत्ती बहिर्मुख होते. याचा परिणाम म्‍हणून ‘दोन्‍ही प्रकारचे नामजप ऐकणार्‍या २ व्‍यक्‍तींमध्‍ये नामजप ऐकण्‍यापूर्वी नकारात्‍मक ऊर्जा नव्‍हती; पण ‘रिमिक्‍स’ प्रकारचा नामजप ऐकल्‍यावर त्‍यांच्‍यामध्‍ये नकारात्‍मक ऊर्जा निर्माण झाली’, असे आढळले.

३ अ २. काळानुसार आणि संतांच्‍या मार्गदर्शनानुसार केलेल्‍या नामजपातील सात्त्विकतेमुळे ऐकणार्‍या व्‍यक्‍तीमधील सात्त्विकता अन् अंतर्मुखता वाढून त्‍याच्‍या सकारात्‍मक ऊर्जेत वाढ होणे : काळानुसार आणि संतांच्‍या मार्गदर्शनानुसार केलेल्‍या नामजपात संतांंच्‍या संकल्‍पामुळे मुळातच सात्त्विकता अन् चैतन्‍य असते. त्‍यामुळे त्‍या नामजपातून मिळणारी स्‍पंदने अधिक सकारात्‍मक असतात. संतांच्‍या चैतन्‍यदायी मार्गदर्शनामुळे आणि भावस्‍थितीत नामजप म्‍हटल्‍यामुळे हा नामजप ऐकल्‍यावर वृत्ती अंतर्मुख होण्‍यास साहाय्‍य होते. याचाच एकूण परिणाम म्‍हणून हा चैतन्‍यदायी नामजप ऐकल्‍यामुळे तीनही व्‍यक्‍तींपैकी एकाही व्‍यक्‍तीमध्‍ये नकारात्‍मकता निर्माण झाली नाही; याउलट ‘त्‍यांच्‍यातील सकारात्‍मकतेत वाढच झाली’, असे दिसून आले.

निष्‍कर्ष

यावरून ‘साधना करणार्‍याने ‘रिमिक्‍स’ प्रकारच्‍या नामजपाऐवजी सात्त्विक नामजप ऐकणे’, हे त्‍याच्‍यातील सात्त्विकता वाढण्‍याच्‍या दृष्‍टीने अधिक लाभप्रद आहे. त्‍याचप्रमाणे ‘कुठलीही गोष्‍ट काळानुसार आणि संतांच्‍या संकल्‍पाने झाली असल्‍यास तिचा आपल्‍याला साधनेसाठी अधिक लाभ होतो’, हेही यातून सिद्ध होते.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.२.२०२३)

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा नामजपांमागे असलेला संकल्‍प  !

‘जगभरातील साधकांचे आध्‍यात्मिक त्रास लवकर दूर व्‍हावेत आणि त्‍यांना देवतांच्‍या तत्त्वांचा अधिकाधिक लाभ व्‍हावा’, यांसाठी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनानुसार देवतांचे नामजप ध्‍वनीमुद्रित केले आहेत. देवतांचे नामजप ध्‍वनीमुद्रित करण्‍यामागे त्‍यांचा संकल्‍पच कार्यरत झाला असल्‍याने या नामजपांनुसार साधकांनी नामजप केल्‍यास त्‍यांचे त्रास दूर होण्‍यास, तसेच त्‍यांना देवतांच्‍या तत्त्वांचा लाभ होण्‍यास निश्‍चितच साहाय्‍य होईल.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

शिवभक्‍तांसाठी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने ध्‍वनीमुद्रित करण्‍यात आलेला सात्त्विक ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप सनातन संस्‍थेच्‍या संकेतस्‍थळावर आणि ‘सनातन चैतन्‍यवाणी’ अ‍ॅपवर उपलब्‍ध !

१. नामजप ऐकण्‍यासाठी सनातनच्‍या संकेतस्‍थळाची मार्गिका : www.sanatan.org/mr/a/824.html

२. ‘सनातन चैतन्‍यवाणी’ अ‍ॅप डाऊनलोड करण्‍यासाठी भेट द्या :  https://www.sanatan.org/Chaitanyavani

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने ध्‍वनीमुद्रित करण्‍यात आलेला सात्त्विक ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप ऐकून काय जाणवते ?’, याचा अभ्‍यास करा आणि काही वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती आल्‍यास त्‍या आम्‍हाला [email protected] या ई-मेल पत्त्यावर किंवा ई-मेल नसलेल्‍यांनी पुढील पत्त्यावर अवश्‍य कळवा.

टपालाचा पत्ता : श्री. अभिजित सावंत, द्वारा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक