पाकिस्‍तानच्‍या कारागृहात ७०० हून अधिक भारतीय नागरिक

अनेक जण वेडे झाल्‍याची माहिती !

अमृतसर (पंजाब) – पाकिस्‍तान सरकारने भारताच्‍या राजू आणि गेमबरा राम या दोघा बंदीवानांची सुटका केली. ते अटारी सीमेच्‍या मार्गे भारतात परतले. ए.एन्.आय. वृत्तसंस्‍थेने या दोघांकडून घेतलेल्‍या माहितीनुसार पाकमध्‍ये ७०० हून अधिक भारतीय नागरिक कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्‍यांची स्‍थिती इतकी वाईट आहे की, ती आम्‍ही सांगूही शकत नाही. त्‍यांच्‍यातील अनेक जण वेडे झाले आहेत. भारत सरकारने लवकरात लवकर त्‍यांना सोडवण्‍यासाठी प्रयत्न करावेत.

भारतीय अधिकारी अरुण पाल यांनी सांगितले की, राजू ५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्‍तानमध्‍ये गेला होता, तर गेमबरा राम एका मुलीचा पाठलाग करत पाकमध्‍ये पोचला होता. दोघांना अटक करून कारागृहात डांबण्‍यात आले होते.

संपादकीय भूमिका 

पाकमध्‍ये खितपत पडलेल्‍या भारतियांना परत आणण्‍यासाठी काहीही न करणार्‍या आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय सरकारांसाठी हे लज्‍जास्‍पद होय ! आतातरी ही आकडेवारी पुढे आल्‍यावर भारत सरकारने त्‍यांच्‍या सुटकेसाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक !