बीबीसीच्या कार्यालयांत सलग दुसर्‍या दिवशीही आयकर विभागाकडून सर्वेक्षण चालू !  

नवी देहली – आयकर विभागाकडून बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांत दुसर्‍या दिवशीही सर्वेक्षण केले जात आहे. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी येथील वित्त विभागातील कर्मचार्‍यांचे भ्रमणभाष, भ्रमण संगणक आणि संगणक जप्त केले आहेत. सर्वेक्षणाच्या काळात आयकर अधिकारी आणि बीबीसी इंडियाचे संपादक यांच्यामध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. संपादकांनी अधिकार्‍यांना संपादकीय विभागातील मजकूर देण्यास नकार दिला.

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. अनेक घंट्यांपासून अधिकारी भ्रमण संगणक आणि कागदपत्रे यांची छाननी करत आहेत.

सध्या काहीही सांगू शकत नाही ! – अमेरिका

अमेरिकेच्या राज्य विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांना बीबीसीच्या सर्वेक्षणाविषयी  विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, आम्हाला त्यातील तथ्य ठाऊक आहे; परंतु सध्या त्याविषयी काहीही सांगू शकत नाही. यासंबंधी माहितीसाठी तुम्ही भारतीय अधिकार्‍यांशी संपर्क साधा.