चीनने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे केले बंद !

बीजिंग – पाकमधील चिनी दूतावासाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणारा विभाग ‘तांत्रिक कारणां’मुळे बंद केला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना चीनचा व्हिसा मिळण्यास अडचण येऊ शकते. चीन सरकारने पाकमधील चिनी दूतावासातील हा विभाग बंद करण्यामागे काही कारणे सांगितलेली नाहीत. १३ फेब्रुवारीपासून हा विभाग बंद करण्यात आला. ‘तो पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहील’, असे सांगण्यात आले.

चिनी नागरिकांना सतर्क रहाण्याचे आदेश

‘पाकमध्ये रहाणार्‍या चिनी नागरिकांनी तेथे रहातांना सतर्कता बाळगावी’, अशी सूचनाही चीन सरकारने दिली आहे. ‘पाकमध्ये विविध प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणार्‍या चिनी नागरिकांना संरक्षण पुरवण्यात येईल’, असे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र पाकमधील असुरक्षित वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चीनने ही सूचना दिल्याचे म्हटले जात आहे.

आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी निधी नाही !

पाकमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आले असून तेथे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पाकमध्ये तेहरिक ए तालिबानचे आतंकवादी ठिकठिकाणी सैनिकांना लक्ष्य करत आहेत; मात्र सैन्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे आतंकवाद्यांवर कारवाई करणे त्याला अशक्य झाल्याचे पुढे आले आहे.