समुद्राची पातळी वाढू लागल्याने मुंबईसह न्यूयॉर्क, लंडन आदी शहरांना मोठा धोका !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची चेतावणी !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस

लंडन (ब्रिटन) – समुद्राची पातळी वाढू लागल्याने जवळपास सर्वच खंडातील मोठ्या शहरांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. यामध्ये कैरो, लागोस, मापुटो, बँकॉक, ढाका, जकार्ता, मुंबई, शांघाय, कोपनहेगन, लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, ब्युनोस आयर्स आणि सँटियागो यांसारख्या शहरांना मोठा धोका आहे, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी दिला आहे. जगभरातील लहान बेट, विकसनशील राज्ये आणि सखल भाग यांमध्ये रहणार्‍या लाखो लोकांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ‘समुद्राच्या पातळीत वाढ – आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी उपाय’ या विषयावर चर्चा झाली. त्या वेळी गुटेरस यांनी ही चेतावणी दिली.

अँटोनियो म्हणाले की, समुद्राची वाढणारी पाणी पातळी आपले भविष्य बुडवत आहे. हे आपल्यासमोरचे मोठे संकट आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होणे हे चिंतेचे कारण आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे अनेक शहरे, सखल भाग आणि अनेक देशांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गेल्या ३ सहस्र वर्षांचा अभ्यास केला, तर आतापर्यंतच्या कोणत्याही शतकापेक्षा १९ व्या शतकात समुद्राच्या जागतिक पातळीत मोठी वाढ झाली आहे. समुद्राची पातळी वाढण्याची सरासरी अलीकडच्या २ शतकांमध्ये वाढली आहे. प्रशांत महासागर गेल्या शतकात गेल्या १ सहस्र १०० वर्षांतील कोणत्याही काळापेक्षा अधिक वेगाने उष्ण झाला आहे. जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित असली, तरीही समुद्राच्या पातळीत वाढ होईल.