लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन् जिवंत आणि ठणठणीत असून लवकरच तो जगापुढे येईल ! – पाझा नेदुमारन, ‘वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तमिळ’चे अध्यक्ष

‘वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तमिळ’चे अध्यक्ष पाझा नेदुमारन याचा दावा !

पाझा नेदुमारन

चेन्नई (तमिळनाडू) – ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम्’ अर्थात ‘लिट्टे’ या संघटनेचा प्रमुख प्रभाकरन् जिवंत आहे, असा दावा तमिळनाडूमधील काँग्रेसचे माजी नेते आणि ‘वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तमिळ’चे अध्यक्ष पाझा नेदुमारन् यांनी केला आहे. ते म्हणाले की, प्रभाकरन् जिवंत आणि ठणठणीत आहे. तो लवकरच जगापुढे येईल. यामुळे त्याच्या मृत्यूविषयी चालू असणार्‍या अफवांना पूर्णविराम मिळेल.

१. नेदुमारन् यांच्या दाव्यानंतर तमिळनाडूचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के.एस्. अलागिरी म्हणाले की, या दाव्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. प्रभाकरन् समोर आले, तर मी त्यांची भेट घेईन. मला त्यांची कोणताही अडचण नाही.

२. लिट्टे ही श्रीलंकेतील स्वतंत्र तमिळ देशाच्या मागणीसाठी सशस्त्र लढा देणारी संघटना आहे. वर्ष १९७६ पासून तिने प्रभाकरन् याच्या नेतृत्वाखाली लढा उभारला होता. वर्ष २००९ मध्ये श्रीलंकेच्या सैन्याने लिट्टेचा पूर्ण निःपात केला. त्या वेळी प्रभाकरन् यालाही ठार केले आणि त्याची छायाचित्रे प्रसारित केली होती. त्याचा मृतदेह श्रीलंकेतील प्रसारमाध्यमांवरूनही दाखवण्यात आला होता. त्यानंतर आठवड्याभराने लिट्टेचा प्रवक्ता सेल्वारासा पथ्मनाथान् याने प्रभाकरन्च्या मृत्यूला दुजोरा दिला होता. तसेच डीएन्ए (गुणसूत्रे) चाचणीमध्येही हा मृतदेह प्रभाकरन्चाच असल्याची पुष्टी झाली होती.