अटकेतील आरोपी आमदार अब्बास अन्सारी याच्यासह कारागृहात मौज करणार्‍या त्यांच्या पत्नीला अटक !

चित्रकूट (उत्तरप्रदेश) – येथील कारागृहात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी अचानक धाड घातल्यानंतर येथे बंदीवान म्हणून असणारे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे आमदार अब्बास अन्सारी त्यांच्या पत्नीसमवेत मौज करत असल्याचे आढळून आले. आमदार अब्बास आणि त्यांची पत्नी निखत हे दोघे प्रतिदिन कारागृह अधीक्षकांच्या खोलीत भेटत होते. जेव्हा धाडी घालण्यात आली, तेव्हा हे दोघे या खोलीत आढळले. निखत यांच्याकडून पैसे, भ्रमणभाष आणि अन्य वस्तू सापडले. पोलिसांनी निखत यांना अटक केली आहे. कारागृह अधीक्षक आणि अन्य अधिकारी यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१.  निखत बानो गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिदिन सकाळी ११ वाजता कारागृहात येत होती आणि ३-४ घंटे अब्बास यांच्यासमवेत घालवून परत जात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. आमदार अन्सारी यांचे वडील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी बंदा कारागृहात अटकेत आहेत.

२. निखत बानो आणि अब्बास यांना भेटण्यासाठी कोणतीही वेळ अन् अनुमती लागत नव्हती. अब्बास यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. चित्रकूट कारागृहात असतांना अब्बास यांनी पत्नीचा भ्रमणभाषद्वारे साक्षीदार आणि फिर्यादी अधिकार्‍यांना धमकावून पैशांची मागणीही केली होती. कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांना सर्व प्रकारच्या भेटवस्तू, पैसे अन् प्रलोभने दिली गेली होती. यामुळे त्यांची पत्नी आरामात कारागृहात काही घंटे घालवत होती.

संपादकीय भूमिका

कारागृहात अटकेत असणार्‍याला सर्व प्रकारची अनुमती घेऊन अंतर ठेवून काही मिनिटांसाठी भेटण्याचा नियम असतांना आमदाराची पत्नी थेट त्यांच्या समवेत कशी सापडते, याचे उत्तर जनतेलाही ठाऊक आहे ! भ्रष्टाचाराची कीड कुठपर्यंत आहे ?, हे जनतेला ठाऊक आहे !