गोव्यात २७ ते ३१ मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प मांडणार

पणजी, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्याच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ ते ३१ मार्च या कालावधीत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वित्तमंत्री या नात्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २७ मार्च या दिवशी वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

याविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गतवर्षीप्रमाणे वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातही गोमंतकीय जनतेला विविध मार्गांनी दिलासा देऊन बळकटी देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. गेल्या अर्थसंकल्पातील बहुतांशी योजना, प्रकल्प, पायाभूत सुविधा यांना गेल्या वर्षभरात सरकारच्या सर्वच खात्यांनी चालना दिली आहे. अर्थसंकल्पातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक घोषणा पूर्ण केल्या आहेत. राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ला अधिक बळकटी देण्यात आली आहे.’’