‘तुर्कीये’चा धडा !

अशा प्रकारची आपत्ती भारतात आली, तर त्‍याला सामोरे जाण्‍यासाठी भारत सिद्ध आहे का ?

तुर्कीये आणि सीरिया या देशांमध्‍ये आलेल्‍या भूकंपात बळी पडलेल्‍यांची संख्‍या ८ सहस्रांहून अधिक झाली असून ३५ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. तुर्कीये आणि सिरीया या देशांतील ११ सहस्रांहून अधिक इमारती नष्‍ट झाल्‍या आहेत. यावरून तेथील हानीचा आपण अंदाज बांधू शकतो. तुर्कीयेत सध्‍या बर्फवृष्‍टी चालू असून ‘भूकंपामुळे बेघर झालेल्‍या लोकांना आश्रय कुठे द्यायचा ?’, असा गंभीर प्रश्‍न तेथील सरकारसमोर आहे. तुर्कीयेत झालेल्‍या भूकंपानंतर ‘अशा प्रकारची आपत्ती भारतात आली, तर त्‍याला सामोरे जाण्‍यासाठी भारत सिद्ध आहे का ?’, अशी चर्चा चालू आहे. गतवर्षात भारतातही १ सहस्रांहून अधिक भूकंप झाले असून देशातील १३ राज्‍यांत अनेक भूकंपप्रवण जिल्‍हे (भाग) असून तेथेही भूकंप होण्‍याची दाट शक्‍यता आहे.

आता देशातील कुठलाही भूभाग भूकंपापासून सुरक्षित राहिलेला  नाही. ‘इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ सायन्‍स’मधील भूकंपतज्ञ रंगाचारी अय्‍यंगार यांनी ‘हिमालयात ८ रिक्‍टरपेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो आणि तसे झाल्‍यास देहलीत महाविनाश होईल’, असे भाकीत वर्तवले आहे.

‘किल्लारी’ भूकंपानंतर भारत काय शिकला ?

महाराष्‍ट्रातील लातूर जिल्‍ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूच्‍या गावांत वर्ष १९९३ मध्‍ये पहाटे भूकंप झाला होता. ६.४ रिक्‍टर स्‍केल तीव्रतेच्‍या या भूकंपात ७ सहस्र लोकांचा बळी गेला होता, तर १६ सहस्र लोक घायाळ झाले होते. ५२ गावांमधील ३० सहस्र घरे जमीनदोस्‍त झाली होती. ही आपत्ती केवळ महाराष्‍ट्रासाठी नाही, तर देशासाठीही मोठी होती. या घटनेतून धडा घेऊन खरेतर शासनाने सतर्क होऊन दीर्घकालीन आपत्‍कालीन कृती आराखडा बनवणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. घरे बांधतांना ती भूकंपरोधक कशी होतील किंवा अल्‍प प्रमाणात हानी होईल, अशा इमारती नंतरच्‍या काळातही बांधण्‍यात आल्‍या नाहीत किंवा शहरांच्‍या विकास आराखड्यांमध्‍येही तशा सुधारणा केलेल्‍या नव्‍हत्‍या.

यानंतर २६ जानेवारी २००१ या दिवशी झालेल्‍या भूज (गुजरात) येथील भूकंपात २ सहस्र बळी गेले, तर ३० सहस्र कोटी रुपयांच्‍या संपत्तीची हानी झाली. जगातील नैसर्गिक आपत्तींची माहिती गोळा करणार्‍या ‘इंटरनॅशनल डिझास्‍टर डेटाबेस’ या संस्‍थेच्‍या अहवालात गेल्‍या २० वर्षांत भारतात भूकंप, चक्रीवादळ, महापूर या नैसर्गिक आपत्तींमुळे ४ लाख कोटी रुपयांची वित्तहानी, तसेच ७६ सहस्र लोकांचे बळी गेल्‍याचे म्‍हटले आहे. अचानक कुठे भूकंप झाल्‍यास तात्‍काळ भूकंपग्रस्‍तांची सुटका, त्‍यांना साहाय्‍य आणि तात्‍काळ पुनर्वसन होईल, या दृष्‍टीकोनातून आपली कोणतीच प्रशासकीय यंत्रणा तशी सक्षम नाही ! भारतात अनेक भागांमध्‍ये लोकसंख्‍येची घनता अधिक असून ती दाटीवाटीत आहे. त्‍यामुळे भूकंप अथवा आग लागणे यांसारख्‍या घटना झाल्‍यास अग्‍नीशमन यंत्रणा तेथपर्यंत पोचण्‍यासाठी पुष्‍कळ कष्‍ट घ्‍यावे लागतात, असेच आतापर्यंत झालेल्‍या अनेक उदाहरणांतून समोर आले आहे.

आपत्तींमध्‍ये भर !

उत्तराखंड येथील जोशीमठ येथील इमारतींमध्‍ये ज्‍या प्रकारे भेगा पडल्‍या आहेत, रस्‍ते खचत आहेत, ते काही एका दिवसात झालेले नसून अनेक वर्षे नियमांची पायमल्ली झाल्‍याने त्‍याचे दृश्‍यपरिणाम आता दिसत आहेत. मुंबईत प्रत्‍येक पावसाळ्‍यात ज्‍या प्रकारे पाणी तुंबते, त्‍याला अतिक्रमण, नाले बुजवणे, समुद्र मागे हटवून बांधकामे करणे अशा गोष्‍टी कारणीभूत आहेत. नदीकाठी अपरिमित उत्‍खनन, अपरिमित वृक्षतोड, अवैध आणि कमकुवत बांधकामे यांमुळे आपत्तींमध्‍ये भर पडत आहे. निसर्गाने वारंवार चेतावणी देऊनही मानव ऐकण्‍यास सिद्ध नसून तो प्रत्‍येक वेळी निसर्गावर आक्रमणच करण्‍याचा प्रयत्न करतो. पुण्‍याजवळ असलेल्‍या ‘लवासा’च्‍या ठिकाणी तर अख्‍खा डोंगर खणण्‍यात आला आणि नदीचे पात्रच अडवण्‍यात आले.

नागरिकांचे प्रशिक्षण अत्‍यावश्‍यक !

साधू-संतांनी सांगितल्‍याप्रमाणे येणारा काळ पहाता तो नैसर्गिक आपत्ती घेऊन येणारच आहे. जपानमध्‍येही सातत्‍याने भूकंप होतो; मात्र तेथे अगदी शालेय स्‍तरापासून विद्यार्थ्‍यांना ‘अशी आपत्ती आल्‍यास कसे वागायचे ?’, याचे प्रशिक्षण दिले जाते. याउलट आपल्‍याकडे शाळा-महाविद्यालयांमध्‍ये असे कोणत्‍याच प्रकारचे प्रशिक्षण देण्‍यात येत नाही. किमान यापुढील काळात तरी शालेय शिक्षणात ‘अशा आपत्तींना सामोरे कसे जायचे ?’, याचे प्रशिक्षण देणे, खासगी आस्‍थापनांमध्‍ये ‘मॉकड्रिल’च्‍या साहाय्‍याने प्रशिक्षित करणे, स्‍वयंसेवी संस्‍थांची आपत्‍कालीन प्रशिक्षणाची शिबिरे घेणे, सामाजिक माध्‍यमांद्वारे सर्वसामान्‍यांना प्रशिक्षित करणे अत्‍यावश्‍यक आहे.


हे ही वाचा – 

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?
https://sanatanprabhat.org/marathi/446918.html

आपत्काळासाठी संजीवनी
https://www.sanatan.org/mr/natural-disasters-and-survival-guide


सद्य:स्‍थितीत घरात अचानक आग लागल्‍यास ती कशी विझवावी अथवा एखाद्या उद़्‍वाहका मध्‍ये (लिफ्‍ट मध्‍ये) अडकल्‍यास प्रथम काय करावे, याचे सामान्‍य ज्ञानही नागरिकांना नाही. अनेक इमारतींमध्‍ये आता अग्‍नीरोधक यंत्रणा आहेत; मात्र त्‍या कशा कार्यरत आहेत, याचे ज्ञान विशेष कुणाला नाही. भारतात असलेल्‍या लोकसंख्‍येचा विचार केल्‍यास एकूण प्रशासकीय पातळीवरील आपत्‍कालीन यंत्रणाही अत्‍यंत तोकड्या आहेत.

‘पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे ही काळाची आवश्‍यकता आहे, ही तुर्कीयेच्‍या भूकंपावरून समस्‍त मानवजातीला चेतावणी आहे’, असे कोल्‍हापूर येथील प.पू. अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजी यांनी सांगितले आहे. भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्‍टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. असे होण्‍यापासून रोखण्‍यासाठी आणि मानवी स्‍वभावात परिवर्तन होण्‍यासाठी साधनाच आवश्‍यक असून त्‍यासाठी आपल्‍या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्‍वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. त्‍यामुळे सरकारने आपत्‍कालीन प्रशिक्षणासमवेत देशातील नागरिकांना साधना शिकवली, तर ते येणार्‍या आपत्‍काळाला संयमाने सामोरे जाऊ शकतील !

तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्‍यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्‍यक !