कोल्हापूर, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शासनाने १ कोटी १७ लाख रुपये संमत केले आहेत. हे अतिक्रमण हटवण्यासाठी बांधकाम विभागाकडून निविदा मागवून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. निविदा प्रक्रियेसाठी काही कालावधी द्यावा लागतो. साधारणत: या मासाच्या शेवटी अतिक्रमण हटवण्याचे काम चालू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या आत विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या सूत्राच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळास ही माहिती दिली.
किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण
काढण्यासाठी सव्वा कोटींचा निधी मंजूर
🔗https://t.co/hqqDLSP0RE#VishalgadFort #ABPMajha pic.twitter.com/3NCIO5CblW— ABP माझा (@abpmajhatv) February 4, 2023
या प्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘‘महाशिवरात्रीच्या दिवशी अथवा अगोदर तेथील काही अतिक्रमणे हटवण्यास प्रशासनाने प्रारंभ करावा म्हणजे प्रशासन अतिक्रमण काढत आहे, असा संदेश सर्वत्र जाईल, तसेच जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन भूमिका घोषित करावी.’’ या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे, शहरप्रमुख रविकीरण इंगवले, उपशहरप्रमुख शशीभाऊ बीडकर, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, विजय नाईक, सुनील कान्हुरकर, माजी नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे यांसह अन्य उपस्थित होते.