हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या उपस्‍थितीत मलंगगडावर उत्‍सव साजरा !

मुख्‍यमंत्र्यांनीही घेतले दर्शन !

एकनाथ शिंदे यांनी मलंगनाथांच्‍या समाधीचे दर्शन घेऊन आरती केली

ठाणे – ठाणे, पालघर आणि अन्‍य जिल्‍हे येथून मलंगगडावरील श्री मलंगनाथांच्‍या उत्‍सवासाठी माघ पौर्णिमा, म्‍हणजे ५ फेब्रुवारी या दिवशी हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते गडावर आले होते. मुख्‍यमंत्री झाल्‍यानंतर पहिल्‍यादांच मलंगगड यात्रोत्‍सवाच्‍या निमित्ताने एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्‍टरने दर्शन सोहळ्‍यासाठी गडावर आले होते. त्‍यांनी श्री मलंगनाथांच्‍या समाधीचे दर्शन घेऊन आरती केली.

या वेळी ‘श्रीमलंग जयमलंग’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ या घोषणांनी परिसर दुमदुमन निघाला होता. कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागाच्‍या वतीने कल्‍याण ते मलंगगड विशेष बसची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती.

मलंगगडावरील हिंदूंंची वहिवाट आणि तेथील धार्मिक परंपरा जपण्‍यासाठी शिवसेनेचे दिवंगत जिल्‍हाप्रमुख आनंद दिघे यांनी वर्ष १९८० पासून येथे माघी पौर्णिमेनिमित्त उत्‍सवाला आरंभ केला. ५० वर्षांहून अधिक काळ ही उत्‍सवाची परंपरा चालू असून धर्मवीर आनंद दिघे यांच्‍यानंतर मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील उत्‍सव आणि लढा पुढे चालू ठेवला आहे.