पाकमध्ये खंडित वीजपुरवठा पूर्ववत चालू होण्यासाठी लोक रस्त्यावर !

इस्लामाबाद – पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोक गव्हाचे पीठ, डाळी यांच्या किमती कमी व्हाव्या आणि खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा चालू व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट भेडसावत आहे. त्याआधी महापुरामुळे आलेल्या संकटामुळे लोक त्रस्त होते. त्यात आता दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे लोक त्रस्त असल्यामुळे या प्रांतांमध्ये वारंवार सरकारच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत.

१. ‘आर्थिक संकटामुळे जनता त्रस्त असतांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्व अपयशी ठरत आहे’, अशी टीका नागरिक करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती सुल्तान महमूद चौधरी हे ब्रिटन, तुर्कीये आणि बेल्जियम या देशांच्या दौर्‍यावर गेले आहेत. या परदेश दौर्‍याविषयी नागरिकांना कल्पना न दिल्यामुळे नागरिक अधिक संतप्त झाले आहेत.

२. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये सरकारने लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये येथील तरुणांनी सैन्याच्या विरोधात निदर्शने केली. ही निदर्शने दडपण्यासाठी सैन्याने तरुणांना कह्यात घेतले. गिलगिट बाल्टिस्तानला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असतांना सरकारने मात्र अजूनही निधी पुरवलेला नाही.

३. गिलगिट बाल्टिस्तान प्रांताला केंद्राकडून पुरवण्यात येणार्‍या निधीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहावे लागत आहे. मागील काही कालावधीत तो प्राप्त न झाल्यामुळे तेथील समस्यांमध्ये वाढ झाली आहे.