आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या दर्शनाला भाविकांचा महासागर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह लाखो भाविक मातेच्या चरणी लीन

मालवण – कोकणचे प्रतीपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीमातेच्या जत्रेला यावर्षी लाखो भाविकांचा महासागर लोटला. कोरोनामुळे गेली ३ वर्षे विविध निर्बंधांमुळे मर्यादित स्वरूपात साजर्‍या कराव्या लागलेल्या या जत्रोत्सवात यावर्षी भाविक मोठ्या आनंदाने सहभागी झाले आणि मातेच्या चरणी लीन झाले. श्री भराडीमातेच्या जयघोषाने येथील परिसर दुमदुमून गेला होता. जिल्हा प्रशासन, पोलीस, तसेच आंगणेवाडी विकास मंडळ आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांनी भक्तांना कोणतीही असुविधा होऊ नये, या दृष्टीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ झाले.

जत्रोत्सवानिमित्त श्री भराडीदेवीला सुवर्णालंकाराने आणि भरजरी साडी नेसवून सजवण्यात आले होते. ३ फेब्रुवारीला मध्यरात्री ३ वाजता पूजा आणि आंगणे कुटुंबियांकडून ओटी भरल्यानंतर सर्वांसाठी देवीचे दर्शन अन् ओटी भरणे चालू करण्यात आले. रात्री ९.३० ते १२ वाजेपर्यंत धार्मिक विधी, देवीचे दर्शन आणि ओट्या भरण्याचा कार्यक्रम थांबवण्यात आला. देवीला प्रसाद दाखवल्यानंतर (ताटे लावणे) त्यानंतर पुन्हा दर्शन चालू करण्यात आले. देवीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जत्रोत्सवाला आलेल्या भाविकांना आंगणेवाडीतील घराघरातून प्रतिवर्षाप्रमाणे प्रसाद दिला गेला. ५ फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत दर्शन आणि ओटी  भरणे चालू असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवीचे दर्शन घेतले. यासह जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.

कोकणसाठी ‘कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण’ निर्माण करण्याचा प्रयत्न ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

श्री भराडीदेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीची ओटी भरली. या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्रातील जनता, शेतकरी यांना सुखी ठेव’, असे साकडे श्री भराडीमातेच्या चरणी घातले. यानंतर ते म्हणाले, ‘‘कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण’ निर्माण करण्याचे विचाराधीन आहे. त्याचबरोबर ‘समृद्धी महामार्गा’च्या धर्तीवर मुंबई-सिंधुदुर्ग या मार्गाचा विकास करण्यात येईल. यामुळे कोकणच्या विकासाला पर्यायाने पर्यटनाला चालना मिळेल. कोकणच्या सर्वांगीण विकासाकरता सरकार कटीबद्ध आहे. श्री भराडीदेवी भक्तनिवासाचा प्रस्ताव सादर करा. त्यासाठी आवश्यक तो निधी देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिली.

आंगणेवाडी जत्रोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित भाविक

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आंगणे कुटुंबियांनी भाविकांची काळजी घेतल्याविषयी समाधान व्यक्त केले. आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला.