हिंदूंमधील ‘धर्म’ या संकल्पनेमुळे मला प्रेरणा मिळाली ! – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

लंडन (ब्रिटन) – गेल्या निवडणुकीत लिझ ट्रस यांच्याकडून पराभव झाल्यानंतर मी थोडा निराश झालो होतो. ‘या पराभवानंतर माझी राजकीय कारकीर्द संपली’, असे मला वाटत होते. हिंदूंमध्ये ‘धर्म’ नावाची एक संकल्पना आहे. त्याचा अर्थ ‘कर्तव्य’ असा होतो. स्वतःचे काम प्रामाणिकपणे करणे, हे माझे कर्तव्य आहे. लहानपणापासून माझ्यावरही हे संस्कार झाले आहेत. एकंदरीतच माझ्याकडून अपेक्षित असलेले काम प्रमाणिकपणे करणे, त्यालाच ‘धर्म’ असे म्हणतात. त्यातूनच मला पुन्हा निवडणूक लढवण्याची प्रेरणा मिळाली, असे उत्तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एका मुलाखतीत दिले. त्यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांची ‘पियर्स मॉर्गन’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या वेळी ते बोलत होते.

पंतप्रधान सुनक पुढे म्हणाले की, गेल्या १०० दिवसांत पंतप्रधान म्हणून मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. आमच्यापुढे आणखी बरीच आव्हाने आहेत; मात्र मला विश्‍वास आहे की, आम्ही ही आव्हाने पार करू. जनतेची सेवा करणे, हेच आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही देशात पालट घडवून आणू, असा मला विश्‍वास आहे.