अमेरिकेतील एका न्‍यायालयाने ‘चॅट जीपीटी’चा वापर करून बनवले निकालपत्र !

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – अमेरिकेतील कोलंबियातील एका न्‍यायालयातील न्‍यायाधिशांनी ‘चॅट जीपीटी’(‘चॅट जीपीटी’ म्‍हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून बनवण्‍यात आलेली संगणक प्रणाली)चा वापर करून निकालपत्र बनवण्‍याची घटना समोर आली आहे.

१. अमेरिकी वृत्तवाहिनी ‘सीबीएस् न्‍यूज’च्‍या वृत्तानुसार न्‍यायाधीश जुआन मॅन्‍युअल पाडिला यांनी म्‍हटले की, एका मुलाच्‍या उपचारासाठी आई-वडील आर्थिकदृष्‍ट्या सक्षम नव्‍हते. त्‍याच्‍या वैद्यकीय खर्चात आणि वाहतूक शुल्‍कात सूट देण्‍याच्‍या प्रकरणात मी चॅट जीपीटीचा वापर केला होता. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्‍यासाठी आम्‍ही या प्रणालीचा वापर केला, तर न्‍यायाधीश म्‍हणून काम करण्‍याच्‍या आमच्‍या क्षमतेवर प्रश्‍न उपस्‍थित करता येईल, असे नाही. याचा वापर करून आम्‍ही एखाद्या सूत्रावर आमच्‍या विचारांना गती देण्‍यासाठी आणखी साहाय्‍य मिळू शकते, असे पाडिला यांनी स्‍पष्‍ट केले.

२. रोजारियो विद्यापिठातील प्राध्‍यापक जुआन डेव्‍हिट गुटरेस यांनी ट्‍वीट करून म्‍हटले की, न्‍यायव्‍यवस्‍थेत चॅट जीपीटीचा वापर करणे धोकदायक आहे, तसेच ते नैतिकदृष्‍ट्या योग्‍य नाही.

३. चॅट जीपीटीवरून बर्‍याचदा सदोष माहितीही समोर येत असल्‍याने याचा संदर्भ म्‍हणून वापर करणे चुकीचा आहे, असेही अनेकांचे मत आहे.