देशातील सर्व प्रमुख शहरांत सतर्कतेची चेतावणी !
मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) ई-मेल पत्त्यावर मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणार्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. मुंबईसह इतर शहरांवरही आक्रमण करणार आहे, असेही या मेलद्वारे सांगण्यात आले आहे. ‘एन्.आय.ए.’ने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून पोलिसांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही अन्वेषणाला प्रारंभ केला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेला ई-मेलवरुन मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. एनआयएने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे. #NIA #Mumbai #MTCard #ThreatEmail #MumbaiPolice pic.twitter.com/iCDaoxY2aP
— Mumbai Tak (@mumbaitak) February 3, 2023
१. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशानंतर हा मेल पाठवण्यात आला आहे, असा दावा मेल करणार्या व्यक्तीने केला आहे. मेल कुणी पाठवला ? नेमका मेल कुठून आला आहे ? याचा शोध अन्वेषण यंत्रणा घेत आहेत.
२. मुंबईसह देशातील इतर शहरात सतर्क रहाण्यास सांगण्यात आले आहे. सिराजुद्दीन हक्कानी तालिबानमधील सर्वांत धोकादायक गट ‘हक्कानी नेटवर्क’चा प्रमुख आहे.
३. अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेनंतर सिराजुद्दीन हक्कानी याला गृहमंत्री बनवण्यात आले आहे. हक्कानी तालिबानचा दुसर्या क्रमांकाचा प्रमुख नेता आहे.
४. जानेवारीमध्येही एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरभाष करत मुंबई शहराच्या विविध भागांत वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. २ मासांत बाँबस्फोट करण्यात येणार आहे, असे दूरभाषवर म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा हा मेल आला आहे.
५. मुंबई शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित उपाहारगृहे, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळ येथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस उपाहारगृह, ताज लॅण्ड्स अँड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्सचेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढवण्यात आली आहे.