श्रीक्षेत्र सज्‍जनगड येथे ३४१ व्‍या ‘दासनवमी महोत्‍सवा’चे आयोजन !

राष्‍ट्रगुरु समर्थ रामदासस्‍वामी

सातारा, १ फेब्रुवारी (वार्ता.) – ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची चैतन्‍यमूर्ती राष्‍ट्रगुरु समर्थ रामदासस्‍वामी यांच्‍या समाधीस्‍थळावर म्‍हणजेच श्रीक्षेत्र सज्‍जनगड येथे श्री रामदासस्‍वामी संस्‍थानच्‍या वतीने ३४१ व्‍या ‘दासनवमी महोत्‍सवा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. शुभकृत् नाम संवत्‍सरे, माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य दशमी, शके १९४४ अर्थात् ६ ते १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हा महोत्‍सव होत आहे.

या महोत्‍सवामध्‍ये प्रतिदिन पहाटे ५ वाजता काकड आरती, पहाटे ५.३० वाजता श्रीराम मूर्ती आणि श्रीसमर्थ समाधी महापूजा, सकाळी १० वाजता महानैवेद्य, सकाळी १०.३० वाजता आरती, छबिना, श्रीसमर्थ रचित १३ आरत्‍या, सकाळी ८ ते ९ प्रवचन, सकाळी ९.३० ते १०.३० सांप्रदायिक भजन, दुपारी १२ वाजता अध्‍यात्‍म रामायण, पुराण आणि सुंदरकांड, दुपारी ३ ते ४ भजन, दुपारी ४ ते ५.३० गायन, सायंकाळी ६ वाजता दैनंदिन उपासना, करुणाष्‍टके आणि सवाया, सायंकाळी ७ वाजता देवतांची दृष्‍ट काढणे, सायंकाळी ७.३० वाजता आरती आणि छबिना, रात्री ८.३० वाजता श्रीमत् ग्रंथराज दासबोध वाचन आणि आरती, रात्री ९ ते ११ कीर्तन, असे कार्यक्रम पार पडणार आहेत. महाराष्‍ट्रातील नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार, गायक, वादक, भजनीमंडळे आपली सेवा समर्पित करणार आहेत. तरी समस्‍त श्रीसमर्थभक्‍तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.