‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस १० फेब्रुवारीपासून मुंबई ते शिर्डी धावणार !

  •  आठवड्यातून ६ दिवस उपलब्‍ध

  •  नाशिक रोडलाही थांबा असणार

नाशिक – राज्‍यात येत्‍या १० फेब्रुवारीपासून मुंबई ते साईनगर (शिर्डी) आणि मुंबई ते सोलापूर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस धावणार आहे. यापूर्वी महाराष्‍ट्रात नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्‍यासाठी या एक्‍सप्रेसला ६ घंटे लागतील.

एक्‍सप्रेसला १६ डबे असतील. तिची प्रवासी क्षमता १ सहस्र १२८ इतकी आहे. गुरुवार वगळता आठवड्यातील ६ दिवस ही एक्‍सप्रेस धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० फेब्रुवारी या दिवशी मुंबई दौर्‍यावर येत असून या वेळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘वंदे भारत’ एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्‍थानकाहून शिर्डीसाठी ही एक्‍सप्रेस सकाळी ६.१५ वाजता निघून दुपारी १२.१५ वाजता शिर्डी येथे पोचेल. दादर, ठाणे, कल्‍याण, इगतपुरी, नाशिकरोड आणि मनमाड हे थांबे असतील. शिर्डी येथून सायंकाळी ५.१५ वाजता सुटून रात्री ११.१५ वाजता ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोचेल.