(म्‍हणे) ‘ख्रिस्‍ती धर्मगुरूंना मारहाण, त्‍यांच्‍यावरील धर्मांतराचे खोटे आरोप थांबवा !’

ख्रिस्‍ती समाजाची जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाद्वारे मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – ख्रिस्‍ती समाजावर, चर्चवर अन्‍याय-अत्‍याचार होत आहे. ख्रिस्‍ती धर्मगुरूंना मारहाण होत असून धर्मांतराचे खोटे आरोप होत आहेत. (आरोप सिद्ध होण्‍याच्‍या अगोदरच ‘खोटे आरोप’, असे कसे काय म्‍हणता येईल ? धर्मांतर करतांना अनेक ख्रिस्‍ती धर्मगुरूंना पकडले आहे, अनेकांनी धर्मांतर केल्‍याचे मान्‍यही केले आहे. – संपादक) चर्चवर आक्रमण केले जात आहे, असे आरोप करत त्‍याच्‍या निषेधार्थ ख्रिस्‍ती समाजाने सोलापूर येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. यात शेकडोंच्‍या संख्‍येने ख्रिस्‍ती सहभागी झाले होते.

या संदर्भात प्रसिद्धीमाध्‍यमांशी बोलतांना मोर्च्‍यातील एक फादर म्‍हणाले, ‘‘भारत देशात ख्रिस्‍ती लोकांना त्रास देण्‍याची प्रवृत्ती वाढली आहे. आम्‍ही भारतीय-महाराष्‍ट्रीय ख्रिस्‍ती आहोत. सरकारने या परिस्‍थितीकडे लक्ष द्यावे.’’ (जगाच्‍या पाठीवर सर्व धर्मातील लोक अत्‍यंत शांततेत आणि सर्व सुविधांसह रहात असलेला एकमेव देश म्‍हणजे भारत ! गरीब, अज्ञानी, आदिवासी हिंदूंचे फसवून आणि आमीषे दाखवून धर्मांतर करण्‍याच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत आहे. त्‍याविरुद्ध ख्रिस्‍ती समाज कधी निषेध करणार का ? मोर्चे काढणार का ? – संपादक)