अर्थसंकल्पाविषयीचे विशेष अभिप्राय

समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – कोणतीही निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला नाही. शेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठेवून हा अर्थसंकल्प करण्यात आला आहे. शेतमालाला चांगला दर मिळावा, पारंपरिक शेतीचे आधुनिकीकरण व्हावे यांवर अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आला आहे. कोणताही घटक अर्थसंकल्पातून वंचित राहिलेला नाही. सर्वसमावेशक आणि मध्यमवर्गियांच्या हिताचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आहे, असा अभिप्राय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.


केंद्रीय अर्थसंकल्प सर्व जनांचे हित साधणारा ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अन्य प्रवर्ग या सर्वांना सर्वांवरील विकास योजनांवर अर्थसंकल्पामध्ये भरीव निधी देण्यात आला आहे. सर्व जनांचे हित साधणारा हा अर्थसंकल्प आहे, असा अभिप्राय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केला.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यांना पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक वाढवण्यासाठी हा अर्थसंकल्प साहाय्यक ठरणार आहे. अर्थसंकल्पामध्ये नैसर्गिक शेतीवर देण्यात आलेला भर महत्त्वाचा आहे. यामुळे भूमी आणि जल यांचे प्रदूषण रोखता येणार आहे. तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पामध्ये सहकार क्षेत्राला महत्त्व देण्यात आले आहे. कृषी पतसंस्थांना बहुउद्देशीय सोसायटीचा दर्जा दिल्यामुळे गावपातळीवर सहकार क्षेत्र बळकट होईल. आयकर उत्पन्नाच्या वाढवलेल्या वार्षिक मर्यादेचा सरकारचा निर्णय सर्वसामान्यांचे हित साधणारा आहे. युवा वर्गासाठी सरकारने घोषित केलेल्या योजना रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणार्‍या आहेत.’’


अर्थसंकल्पातून महासत्ता होण्यासाठी भारताने पाऊल टाकले आहे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई – ज्यांना राष्ट्र आणि जनता प्रिय आहे, अशांनी केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर, तसेच भय, भूक, विषमता यांपासून मुक्त आणि समतायुक्त भारत निर्माण करणारा हा अर्थसंकल्प देशाला पुढे नेणारा आहे. जग आर्थिक मंदीशी झुंजत असतांना या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल टाकले आहे, असा विश्‍वास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.