वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी ठेवून घेतलेले निर्णय, ही देशाची ओळख ! – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आरंभ

नवी देहली – देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. आज भारताच्या ‘डिजिटल नेटवर्क’(विकासासाठी आधुनिक माध्यमांचा वापर) मधून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य मिळत आहे. आज वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयांसाठी देश ओळखला जात आहे. जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेवरून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. येत्या २५ वर्षांत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मविश्‍वास वाढवण्याचा हा पाया आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केले. ३१ जानेवारी या दिवशी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आरंभ झाला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याची राष्ट्र्रपती मुर्मू यांची ही पहिलीच वेळ आहे.

राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, भगवान बसवेश्‍वर म्हणाले होते की, कर्म ही पूजा आणि कर्मातच शिव आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गानुसार सरकार राष्ट्रउभारणीत सक्रीय आहे. भारतात एक स्थिर, निर्भय आणि निर्णायक सरकार आहे. सर्वांचे दायित्व पार पाडण्यास सक्षम असणारा, तसेच गरिबी नसणारा अन् मध्यमवर्ग श्रीमंत असणारा, असा आत्मनिर्भर भारत आपल्याला बनवायचा आहे. काळाच्या पुढे दोन पावले रहाणारे तरुण इसतील, असा भारत असावा, असे मला वाटते.