समाजवादी पक्षाच्या नेत्यांना मठ-मंदिरांमध्ये प्रवेशबंदी ! – संत समाजाची घोषणा

‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या मागणीचे प्रकरण

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर त्यांना विरोध होत असतांनाही पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांचा बचाव करत त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले. यामुळे साधू-संत संतप्त झाले आहेत. येथील माघ मेळ्यामध्ये सहभागी झालेल्या साधू-संतांनी ‘आम्ही आमच्या मठ-मंदिरांमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्यांना प्रवेश देणार नाही’, अशी घोषणा केली आहे.

समाजवादी पक्षाच्या पतनाची वेळ आली आहे ! – संत शिवयोगी मौनी बाबा महाराज

संत शिवयोगी मौनी बाबा महाराज

संत शिवयोगी मौनी बाबा महाराज म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या पतनाची वेळ आली आहे. संत समाजाने ठरवले आहे की, लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षावर बहिष्कर घालण्याविषयी सध्या चालू असलेल्या माघ मेळ्यातील भाविकांना सांगण्यात येईल. जो रामाचा नाही, तो काही कामाचा नाही. जर तुम्ही हिंदूंचे धर्मग्रंथ, भारतमाता आणि राष्ट्रगीत यांचा अवमान कराल आणि तुम्हाला बढती देण्यात येत असेल, तर आम्ही हे स्वीकारणार नाही.