रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरातील गुरुपरंपरेतील संतांच्‍या छायाचित्रांंकडे पाहून नामजप करतांना साधकाला आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

‘१७.११.२०२१ या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत होतो. नामजपाच्‍या आरंभी माझ्‍या मनात असंख्‍य विचार येत होते. त्‍यामुळे मी ध्‍यानमंदिरातील सनातनच्‍या गुरुपरंपरेतील (सनातनची गुरुपरंपरा – श्रीमत्‍परमहंस चंद्रशेखरानंद, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्‍तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज (प.पू. भक्‍तराज महाराज यांचे उत्तराधिकारी), शिष्‍य डॉ. जयंत आठवले) संतांच्‍या छायाचित्रांंकडे पाहून नामजप करण्‍याचा प्रयत्न केला. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१. श्रीमत्‍परमहंस चंद्रशेखरानंद यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना मन निर्विचार स्‍थितीत जाणे आणि ध्‍यान लागणे

श्री. अमित हावळ

श्रीमत्‍परमहंस चंद्रशेखरानंद यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना त्‍यांची दिव्‍य ध्‍यानस्‍थ मुद्रा पाहिल्‍यानंतर माझे मन हळूहळू निर्विचार स्‍थितीत जाऊ लागले. त्‍यानंतर काही क्षण माझे ध्‍यान लागले.

२. श्री अनंतानंद साईश यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती

अ. श्री अनंतानंद साईश यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘माझ्‍या मनातील विचार पूर्णपणे नष्‍ट होऊन मी श्री अनंतानंद साईश यांच्‍याशी एकरूप होत आहे’, असे मला जाणवले.

आ. त्‍यानंतर ‘माझ्‍या सभोवतालचा संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला आहे’, असे मला जाणवले.

इ. श्री अनंतानंद साईश यांच्‍या मुखकमलाच्‍या ठिकाणी मला हनुमंताचे दर्शन झाले. हनुमंताचे रूप पुष्‍कळ तेजस्‍वी असल्‍याने मला ते रूप पहाता येत नव्‍हते. त्‍यामुळे थोड्या थोड्या वेळाने काही क्षणांपुरतेच मला हनुमंताचे दर्शन होत होते. मी १० ते १५ मिनिटे ही स्‍थिती अनुभवत होतो. त्‍या वेळी ‘माझ्‍या सहस्रारातून दिव्‍य शक्‍ती प्रवाहित होत आहे आणि ती संपूर्ण शरिरात पसरत आहे’, असे मला जाणवले.

ई. त्‍यानंतर मला सहस्रार आणि अनाहतचक्र या स्‍थानी विशिष्‍ट स्‍पंदने जाणवली. त्‍या वेळी माझे मन शांत, स्‍थिर आणि एकाग्र झाले होते. ‘ध्‍यानावस्‍था म्‍हणजे काय असते !’, हे मी प्रथमच अनुभवत होतो. ही अनुभूती पुष्‍कळ विलक्षण आणि अद़्‍भुत होती.

उ. त्‍यानंतर काही वेळ माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप आपोआप होत होता.

ऊ. मला पुष्‍कळ उत्‍साही वाटत होते.

या अनुभूती दिल्‍याबद्दल मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अमित हावळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक