पुरस्‍काराचा मान !

प्रजासत्ताकदिनाच्‍या आदल्‍या दिवशी देशातील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍कार ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ यांची घोषणा होते, त्‍याप्रमाणे या वर्षीही झाली. ‘एखाद्या विद्यार्थ्‍याला मिळणारे छोटे बक्षीस काय किंवा राष्‍ट्राचा सर्वोच्‍च पुरस्‍कार काय ?’, सर्व पुरस्‍कार हे त्‍या व्‍यक्‍तीच्‍या कर्तृत्‍वाचा गुणगौरव करणारे तर असतातच; पण त्‍याही पुढे जाऊन पुरस्‍कारप्राप्‍त करणार्‍या व्‍यक्‍तीचा समाजासमोर आदर्श ठेवला जातो. अशा पुरस्‍कारप्राप्‍त मान्‍यवरांचा कळत नकळत समाज अनुसरण करतो. त्‍यामुळे अर्थातच कुठलेही बक्षीस किंवा पुरस्‍कार संबंधितांना देणार्‍यांचे दायित्‍वही अतिशय महत्त्वाचे असते. भारतीय समाजात व्‍यक्‍तीनिष्‍ठता पहायला मिळते. त्‍यामुळे चुकीच्‍या व्‍यक्‍तीला पुरस्‍कार घोषित केल्‍यास समाजावर त्‍याचा दुष्‍परिणाम होऊ शकतो.

चांगला पायंडा !

सर्वच क्षेत्रांत योगदान देणार्‍या भारतीय व्‍यक्‍तींना दिल्‍या जाणार्‍या या पुरस्‍कारात यंदा ‘अध्‍यात्‍म’ या क्षेत्रात लिखाण किंवा कार्य करणार्‍या ४ व्‍यक्‍तींना पुरस्‍कार देण्‍यात आला आहे. हरियाणाचे डॉ. सुकुमा आचार्य, लडाखचे कुशोक थिकसे नवांग चंबा स्‍टेनजिन यांना ‘पद्मश्री’, तर तेलंगाणा राज्‍यातील स्‍वामी चिन्‍ना जियर आणि कमलेश डी. पटेल यांना ‘पद्मभूषण’ पुरस्‍कार देण्‍यात आला आहे. वर्ष १९५४ पासून हे पुरस्‍कार देण्‍यास आरंभ झाला; परंतु ‘जन्‍माने मुसलमान आणि कर्माने ख्रिस्‍ती’ असणारे नेहरूंसारखे पंतप्रधान या हिंदूंच्‍या देशाला लाभल्‍याने या पुरस्‍कारांमध्‍ये या हिंदुस्‍थानाचा आत्‍मा असणार्‍या अध्‍यात्‍माचा समावेश झाला नाही; मात्र आता काळ पालटला आहे. यंदा ४ जणांना दिल्‍या गेलेल्‍या अध्‍यात्‍म या क्षेत्रातील पुरस्‍कारामुळे या देशाची मूळ संस्‍कृती आणि खरी ओळख असलेल्‍या आध्‍यात्मिक क्षेत्राचे महत्त्व आंग्‍लाळलेल्‍या हिंदु समाजापर्यंत या निमित्ताने पोचण्‍यास एक प्रकारचे साहाय्‍य होईल. अभ्‍यासक्रमातून हिंदूंचा सत्‍य इतिहास लोकांपर्यंत पोचवण्‍यास झटणारे डॉ. एस्.एल्. भैरप्‍पा, सामाजिक कार्य करणार्‍या सुधा मूर्ती, कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे खादर वली दुडेकुला आदींना मिळालेला पुरस्‍कार सुखावणारा आहे. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन, प्रसिद्ध गायिका सुमन कल्‍याणपूर यांनाही पुरस्‍कार मिळाल्‍यामुळे या पुरस्‍काराचा दर्जा उंचवायला नक्‍कीच साहाय्‍य होईल. कला, साहित्‍य, विज्ञान आदी विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणार्‍या लोकांची संख्‍या भारतात मोठी आहे. यांतील बहुतांश जण व्रतस्‍थ जीवन जगून त्‍या त्‍या क्षेत्रात उंच भरारी घेतात. खादर वली दुडेकुला यांचेच उदाहरण घ्‍यायचे झाले, तर ते अमेरिकेत गलेलठ्ठ वेतनाची नोकरी करत होते. वर्ष १९८६-८७ या काळात एक मुलगी सहाव्‍या वर्षी वयात आल्‍याच्‍या ‘केस’चा अभ्‍यास करतांना त्‍यांना निरोगी जीवन जगण्‍याची आवश्‍यकता आणि त्‍यासाठी निरोगी धान्‍य खाण्‍याचे महत्त्व पटले. त्‍यानंतर त्‍यांनी सुखवस्‍तू जीवन त्‍यागून ‘निरोगी समाजा’च्‍या निर्मितीसाठी धान्‍याविषयी संशोधन केले. समाजासाठी निष्‍काम भावनेने कार्य करणार्‍या अशा व्‍यक्‍तींना समाजासमोर आणून त्‍यांचा सन्‍मान करणे, हे शासनकर्त्‍यांचे कर्तव्‍य आहे. त्‍यामुळे अशांना पुरस्‍कार मिळणे, ही सामाजिक दृष्‍टीने नक्‍कीच आनंददायी गोष्‍ट आहे.

…अशांना पुरस्‍कार का ?

जगद़्‍विख्‍यात गायिका लता मंगेशकर किंवा रॉकेट तंत्रज्ञानातील शास्‍त्रज्ञ नम्‍बी नारायण यांसारख्‍या व्‍यक्‍तींना दिले गेलेले पुरस्‍कार हे त्‍या पुरस्‍काराचा मान राखतात; किंबहुना वाढवतातही. काँग्रेस किंवा त्‍यानंतरच्‍या काळातही काही चित्रपट कलाकार किंवा देशविरोधी विचारसरणी असणार्‍यांना पुरस्‍कार दिले गेले की, त्‍यांची नावे वाचल्‍यावर ‘यांचा राष्‍ट्राच्‍या किंवा समाजाच्‍या उन्‍नतीत काय सहभाग आहे ?’, असा प्रश्‍न सामान्‍य नागरिकांच्‍या मनात आल्‍याविना राहिला नाही. या वर्षी पुरस्‍कार मिळालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या नावांची सूची पाहिल्‍यास काही नावे सामान्‍य नागरिकांना नक्‍की खटकतील, अशी आहेत. त्‍यांतील एक चित्रपट अभिनेत्री रविना टंडन होय. कोणता निकष ठेवून रविना टंडन यांना पद्मश्री पुरस्‍कार देण्‍यात आला ? अभिनेत्री म्‍हणूनही टंडन यांची कामगिरी तशी सुमार होती. त्‍यापेक्षा उत्तम अभिनय आणि सामाजिक जाणीव ठेवून कला सादर करणार्‍या एखाद्या चांगल्‍या कलाकाराला हा पुरस्‍कार दिला असता, तर समाजापर्यंत चांगला संदेश गेला असता.

पद्मभूषण हा उच्‍च कोटीच्‍या विशिष्‍ट सेवेसाठी आणि पद्मविभूषण पुरस्‍कार हा असाधारण अन् विशिष्‍ट सेवेसाठी दिला जातो; मात्र आतापर्यंत काही निवडक वगळता ज्‍या चित्रपट कलाकारांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला, त्‍यामध्‍ये शाहरूख खान किंवा आमीर खान यांचा भरणा आहे. आतापर्यंत बहुतांश चित्रपट कलावंतांना मिळालेले पुरस्‍कार म्‍हणजे त्‍या पुरस्‍काराचा अवमान होय. पूर्वेतिहास पहाता चित्रपट क्षेत्रातील लोकांना पुरस्‍कार देतांना या वेळी तरी केंद्र शासनाने कठोर निकष लावणे अपेक्षित होते.

भारताचा सर्वोच्‍च पुरस्‍कार ‘भारतरत्न’ यानंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पुरस्‍कार म्‍हणजे ‘पद्मविभूषण’. यावर्षी २ ‘मरणोत्तर पद्मविभूषण’ पुरस्‍कार देण्‍यात आले. त्‍यांपैकी एक उत्तरप्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला. मुलायमसिंह यांनी निष्‍पाप कारसेवकांवर गोळ्‍या घालण्‍याचा आदेश देऊन त्‍यांचे मृतदेह शरयू नदीत फेकले होते. त्‍यांना हा पुरस्‍कार देणे, हे लक्षावधी हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या जखमेवर मीठ चोळण्‍यासारखे झाले. मुलायमसिंह यांनी समाज आणि राष्‍ट्र यांसाठी कोणती भरीव कामगिरी केली ? त्‍यांच्‍या कार्यकाळात उत्तरप्रदेश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला. भ्रष्‍ट आणि राष्‍ट्रविघातक कारवाया करणार्‍या मुलायमसिंह यादव यांना ते जिवंत असतांना कठोर शिक्षा होण्‍याऐवजी त्‍यांना ‘मरणोत्तर पद्मविभूषण’ पुरस्‍कार दिला जाणे, हे चीड आणणारे आहे. एकंदरीत यावर्षी चांगल्‍या व्‍यक्‍तींना पुरस्‍कार दिल्‍याचा आनंद जरी असला, तरी राष्‍ट्रघातकी आणि राष्‍ट्र किंवा समाज यांप्रती काहीही भरीव कामगिरी न करणारे लोक यांचा गौरव होणे, हे सामान्‍य जनतेच्‍या पचनी न पडणारे आहे !

अध्‍यात्‍मक्षेत्रातील व्‍यक्‍तींना ‘पद्म पुरस्‍कार’ मिळणे, ही येत्‍या काळातील देशातील आध्‍यात्मिक वातावरणाची नांदी !