सातारा जिल्‍ह्यात विजेची चोरी करणार्‍या ग्राहकांकडून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल !

सातारा, २६ जानेवारी (वार्ता.) – महावितरण विभागाने वीजचोरीची तपासणी करण्‍याची मोहीम हाती घेतली असून एप्रिल २०२२ पासून जिल्‍ह्यात आतापर्यंत दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आलेला आहे. (एका जिल्‍ह्यात वर्षभरातील वीजचोरीची स्‍थिती अशी असेल, तर एकूण महाराष्‍ट्रातील वीजचोरी किती मोठ्या प्रमाणावर होत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! वीजचोरी करणार्‍या ग्राहकांच्‍या कारवाई समवेतच संबंधित घटनेला उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांवर महावितरण कारवाई करणार का ? याची माहितीही वीजग्राहकांना मिळायला हवी. – संपादक)

महावितरणकडून जिल्‍ह्यातील ७ सहस्रांहून अधिक वीजग्राहकांची पडताळणी केली. या मध्‍ये २२२ ठिकाणी विजेचा गैरवापर झाल्‍याचे निदर्शनास आले. अशा ग्राहकांकडून ३८ लाख २२ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे, तसेच विद्युत् वाहिनीवर आकडा टाकून, वीज मीटरमध्‍ये छेडछाड करून वीजचोरी करणार्‍या जिल्‍ह्यातील १ सहस्र ८६ ग्राहकांवर महावितरणने कारवाई केली आहे. महावितरणच्‍या नोंदणीनुसार संबंधित ग्राहकांनी ९ लाख ८ सहस्र ३८ युनिट विजेची चोरी केली असून अशा ग्राहकांकडून १ कोटी १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आलेला आहे.

घरगुती वीजमीटरमधील विजेचा वापर व्‍यावसायिक किंवा औद्योगिक कारणांसाठी करणे हा विजेचा गैरवापर असून तो कायद्याने गुन्‍हा आहे. तरीही अनेक ग्राहक विजेचा गैरवापर करतात. अशा ग्राहकांना पुढे कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

संपादकीय भूमिका 

एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची चोरी होत असतांना प्रशासन काय करत होते ? विजेची चोरी होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना काढणे आवश्‍यक !