सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या सत्र परीक्षा चालू झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी सर्व उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग होणार असून या उत्तरपत्रिका ‘ऑनस्क्रीन’ पद्धतीने पडताळल्या जाणार आहेत. या माध्यमातून अल्प वेळेत निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाणार असेल, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. स्कॅनिंग झालेल्या उत्तरपत्रिका पडताळण्यासाठी १८ महाविद्यालयांमध्ये ‘कॅप सेंटर’ सिद्ध करण्यात आले आहेत. याच ‘कॅप सेंटर’मध्ये जाऊन प्राध्यापकांना उत्तरपत्रिकांची स्कॅन कॉपी पडताळावी लागणार आहे. संगणकाच्या साहाय्याने विशिष्ट ‘अॅप्लिकेशन’मध्ये उत्तरपत्रिका पडताळली जाणार आहे.
विद्यापिठाच्या परीक्षेत मागील वर्षी सावळा गोंधळ समोर आला होता. एम्.ए.च्या ऊर्दू विषयाची प्रश्नपत्रिका हस्तलिखित आणि उत्तराच्या खुणा करून विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. विद्यापिठात एम्.ए., एम्.एस्सी., बी.ए. मराठीला जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. बी.एस्सी. गणितसाठी हस्तलिखित प्रश्नपत्रिका देण्यात आली होती, तर सिव्हिल अभियांत्रिकीच्या पेव्हमेंट विषयाची प्रश्नपत्रिका काढली नसल्याचे ऐन परीक्षेत लक्षात आले. यंदाच्या वर्षी उत्तरपत्रिकांची ‘ऑनस्क्रीन’ पडताळणी झाल्यास मागील वर्षीचा सांवळा गोंधळ रोखला जाईल, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.