जुना पुणे नाका ते सोरेगाव रस्‍त्‍याचे काम अपूर्ण राहिल्‍याने अपघातांची संख्‍या वाढली !

‘वेकअप फाऊंडेशन’चे महापालिकेकडे निवेदन

प्रतिकात्मक चित्र

सोलापूर – जुना पुणे नाका ते सोरेगाव हा ५४ मीटरचा रस्‍ता तातडीने पूर्ण करा, अशी मागणी ‘वेकअप फाऊंडेशन’ने महापालिकेतील अतिरिक्‍त आयुक्‍त संदीप कारंजे यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली. हा रस्‍ता रखडल्‍याने शहरातील अपघातांची संख्‍या वाढली असून नागरिकांचे नाहक जीव जात आहेत, असे निवेदनात म्‍हटले आहे.

५४ मीटरच्‍या रस्‍तेबांधणीसाठी ५ डिसेंबर २०२२ या दिवशी शासनाने महापालिकेला कर्ज देण्‍याची अनुमती दिली; मात्र पुढील कार्यवाही होत नाही. त्‍यामुळे जड वाडतूक शहरात येत आहे. २२ जानेवारी या दिवशी छत्रपती संभाजीराजे चौक येथे झालेल्‍या अपघातात १० वर्षांच्‍या मुलाचा नाहक बळी गेला. ‘महापालिका केवळ बघ्‍याची भूमिका घेणार का ?’ असा प्रश्‍न ‘वेकअप फाऊंडेशन’चे अध्‍यक्ष मिलिंद भोसले यांनी उपस्‍थित केला.