जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अंनिसचे शाम मानव यांच्या सुरक्षेत वाढ !

शाम मानव यांच्या मुलाच्या भ्रमणभाषवर देण्यात आली धमकी !

नागपूर – ‘बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्याविरुद्ध बोलणे थांबवले नाही, तर तुमचा नरेंद्र दाभोलकर करू’, अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांना २३ जानेवारी या दिवशी दूरभाषद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. येथील रविभवन येथेही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

(सौजन्य : Zee 24 Taas)

बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या ‘प्रेत दरबार’ आणि ‘दिव्य दरबार’वर आक्षेप घेऊन ‘अंधश्रद्धा पसरवली जात आहे’, असा आरोप शाम मानव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर शाम मानव यांच्या मुलाच्या भ्रमणभाषवर ही धमकी देण्यात आली. धमकी मिळताच मानव यांच्या मुलाने येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी त्वरित शाम मानव यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. त्यांच्यासमवेत आणखी ४ सशस्त्र पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाशी संबंध नाही ! – शाम मानव, संस्थापक, अंनिस

डावीकडून पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज आणि शाम मानव

नागपूर – बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनाही धमकी मिळाली असून या संदर्भात मध्यप्रदेश राज्यातील छतरपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. याविषयी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव म्हणाले, ‘‘या प्रकरणाशी आमचे काही देणेघेणे नाही. धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज जोपर्यंत आमचे आव्हान स्वीकारून आपली ‘दिव्य शक्ती’ सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना ‘महाठग’ म्हणत राहू.’’