त्र्यंबकेश्वर – नुकत्याच पार पडलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या वेळी श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, शाखा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडून ५० सहस्रांहून अधिक वारकरी भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दशमी, एकादशी आणि वारस असे ३ दिवस हा महाप्रसाद दिला गेला. या वेळी ७४ गावांना १० टाळजी, १ वीणा, १ मृदंग आणि १ हातोडी असे भजनी साहित्य, तसेच श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा आणि श्री एकनाथी भागवत या संत वाङ्मयांची भेट देण्यात आली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नुकत्याच झालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेत भाविकांचा उत्साह दिसून आला.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून वार्या, पालखी आणि पायी दिंड्या, तसेच ३ लाखांहून अधिक वारकरी अन् भक्त येथे आले होते. श्री गजानन महाराज संस्थानच्या त्र्यंबकेश्वर शाखेने ३ दिवस १२-१२ घंटे वारकरी आणि भक्त यांच्यासाठी विनामूल्य महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली होती. त्याचा भाविकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे. श्री निवृत्ती महाराज वारी निमित्ताने येथे आलेल्या ५२१ दिंड्यांचे संस्थेच्या वतीने हार, उपरणे आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.