संपूर्ण पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित !  

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये २३ जानेवारीला अचानक वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे अनेक शहरांमध्ये अनेक घंटे वीज नव्हती. ‘वीज यंत्रणा पूर्ववत् होण्यासाठी ८ ते १० घंटे लागू शकतात’, असे सांगण्यात आले. याविषयी पाकच्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, ‘नॅशनल ग्रीड’ सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांनी बंद पडयाने वीज यंत्रणा कोलमडली. यंत्रणेतील बिघाड सुधारण्यासाठी वेगाने काम केले जात आहे.

ऊर्जामंत्री खुर्रम दस्तागीर यांनी ‘जिओ न्यूज’ला सांगितले की, वीज बचतीसाठी हिवाळ्यात पाकिस्तानामध्ये वीजनिर्मिती ‘युनिट्स’ बंद ठेवले जातात. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास जेव्हा यंत्रणा चालू करण्यात आली, तेव्हा उत्तर पाकिस्तानातील क्षेत्राच्या व्होल्टेजवर दबाव आला. त्यामुळे एकामागून एक असा यंत्रणेत बिघाड होत गेला.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही पाकिस्तानमध्ये अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी कराची, लाहोरसारख्या शहरांमध्ये अनुमाने १२ घंटे वीजपुरवठा नव्हता.