वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्‍पाला अंदाजपत्रक तरतूद करा !

जल अभ्‍यासक प्रवीण महाजन यांची देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे मागणी !

नागपूर – विदर्भाचा कायापालट करणार्‍या ‘वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्‍पा’साठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी जल अभ्‍यासक प्रवीण महाजन यांनी २१ जानेवारी या दिवशी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. हा प्रकल्‍प ४२६.५ कि.मी. भागांतून जाणार आहे. तेथील ६ जिल्‍ह्यांना ‘सुजलाम् सुफलाम्’ करणार आहे. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्‍पासाठी अर्थसंकल्‍पात तरतूद करण्‍यात यावी, असे महाजन यांनी पत्रात म्‍हटले आहे.

त्‍यांनी सांगितले आहे की,…

१. विदर्भातील ६ जिल्‍ह्यांतील शेतकर्‍यांच्‍या ३ लाख ७१ सहस्र २०० हेक्‍टर भूमीला जलसिंचन देणारा हा प्रकल्‍प महत्त्वपूर्ण असून अनेक गावांचा पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न संपुष्‍टात येईल.

२. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अकोला या जिल्‍ह्यांतील गावांना ८ दिवसांतून एक वेळ पिण्‍याचे पाणी मिळते. काही ठिकाणी तर १५ दिवसांतून एकच वेळ पाणी येते. ते पाणी आरोग्‍यदृष्‍ट्या चांगले असेल, याचा नेम नसतो.

३. सिंचन सुविधांअभावी शेती करता येत नाही. त्‍यामुळे कुटुंबाचे पालनपोषण करणे अशक्‍य होते. शेवटी शेतकरी कंटाळून आत्‍महत्‍या करत आहेत.

४. नदीजोड प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यास शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍याही थांबून त्‍यांना त्‍यांची आर्थिक परिस्‍थिती सुधारता येईल.