(म्‍हणे) ‘मुसलमानांच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍या गोष्‍टी थांबवण्‍यासाठी प्रयत्न करावा !’ – पाकचे आवाहन

स्‍विडनमध्‍ये कुराण जाळण्‍यात आल्‍यानंतर पाकिस्‍तान आणि तुर्कीये यांचा संताप !

प्रातिनिधिक छायाचित्र

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – युरोपमधील स्‍विडन देशाची राजधानी स्‍टॉकहोम येथे तुर्कीये देशाच्‍या दूतावासासमोर निदर्शने करणार्‍यांनी कुराण जाळल्‍यानंतर तुर्कीयेच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने आणि आता पाकिस्‍तानने निंदा केली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्‍यानंतर स्‍विडनने ‘नाटो’ (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’) देशांमध्‍ये सहभागी होण्‍याची विनंती केली आहे. त्‍याला नाटो देशातील तुर्कीयेने विरोध केला आहे. त्‍यामुळे स्‍विडनला नाटो देशात सहभागी करून घेता आलेले नाही. याचा विरोध करण्‍यासाठी स्‍विडनच्‍या नागरिकांनी स्‍टॉकहोम येथे निदर्शने करतांना कुराण जाळले.

याविषयी पाकिस्‍तानने म्‍हटले आहे की, हे एक मूर्खतापूर्ण आणि इस्‍लामद्वेषातून करण्‍यात आलेले कृत्‍य असून यामुळे जगभरातील दीडशे कोटींहून अधिक मुसलमानांच्‍या धार्मिक भावना दुखावण्‍यात आल्‍या आहेत. अशा प्रकारच्‍या कृत्‍यांचा अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या अधिकारामध्‍ये समावेश करता येणार नाही. अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यामध्‍ये आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकारांच्‍या संदर्भात दायित्‍वाही समाविष्‍ट आहे. इस्‍लाम शांतीचा धर्म आहे आणि पाकिस्‍तानसमवेत जगभरातील मुसलमान सर्व धर्मांचा आदर करण्‍यावर विश्‍वास ठेवतात. (याहून मोठा विनोद कोणताच असू शकत नाही ! – संपादक) प्रत्‍येकाला दुसर्‍या धर्माचा आदर करता आला पाहिजे. (पाकिस्‍ताने असे म्‍हणणे म्‍हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली !’ असे म्‍हणण्‍यासारखे आहे ! – संपादक) आम्‍ही स्‍विडनला आवाहन करतो की, ते मुसलमानांच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍या गोष्‍टी थांबवण्‍यासाठी प्रयत्न करावा. (भारताने पाकला हिंदूंच्‍या संदर्भात असेच आवाहन केल्‍यावर पाक त्‍याला किती प्रतिसाद देतो, हे जगाला ठाऊक आहे ! – संपादक)