पणजी, २० जानेवारी (वार्ता.) – राजकारण्यांशी संबंधित वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये असलेले सर्व फौजदारी खटले मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दक्षिण गोवा प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईर्शाद आगा यांच्याकडे हस्तांतरित केले आहेत. राजकारण्यांच्या विरुद्ध असलेले फौजदारी खटले जलद गतीने निकालात काढण्यासाठी एकाच न्यायालयाकडे द्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे सर्व खटले उच्च न्यायालयाने दक्षिण गोवा प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात वर्ग केले आहेत.
सध्या राज्यात राजकारण्यांविरुद्ध प्रविष्ट करण्यात आलेले अनेक खटले प्रलंबित आहेत. वर्ष २००८ मध्ये पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणातील बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्या विरोधातील खटला प्रलंबित आहे. लुईस बर्जर लाच प्रकरणी दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव या २ माजी मुख्यमंत्र्यांविरुद्धचा खटला म्हापसा येथील विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. वर्ष २०१६ मधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्धचा खटला प्रलंबित आहे. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अन्य काही राजकारण्यांच्या विरोधातही वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये फौजदारी खटले प्रलंबित आहेत. या सर्व खटल्यांची सुनावणी आता दक्षिण गोवा प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात होणार आहे.