देहलीपासून मुंबईपर्यंत समन्‍वय असलेली व्‍यवस्‍था आणा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – शहरांच्‍या विकासासाठी सामर्थ्‍य आणि इच्‍छाशक्‍ती यांची कोणतीही न्‍यूनता केंद्रशासनामध्‍ये नाही; परंतु मुंबईसारख्‍या शहरामध्‍ये महानगरपालिकेसारख्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था विकासासाठी सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विकास गतीने होऊ शकत नाही. राज्‍यात आणि शहरात विकासासाठी समर्पित शासन असेल, तरच विकास गतीने होईल. त्‍यामुळे देहलीपासून महाराष्‍ट्रापर्यंत आणि महाराष्‍ट्रापासून मुंबईपर्यंत समन्‍वय असलेली व्‍यवस्‍था आणा, असे एकप्रकारे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्‍थापन करण्‍याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. १९ जानेवारी या दिवशी वांद्रे येथील बीकेसी मैदानावर सार्वजनिक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ‘मुंबईतील माझ्‍या सर्व बंधूभगिनींना माझा नमस्‍कार’, अशा प्रकारे मराठीतून पंतप्रधानांनी भाषणाला प्रारंभ केला.

या वेळी पंतप्रधान म्‍हणाले, ‘‘मुंबईच्‍या विकासात मुंबई महानगरपालिकेची भूमिका महत्त्वाची आहे. मुंबईचा हक्‍काचा पैसा विकासावर योग्‍य प्रकारे व्‍यय झाला पाहिजे. हा पैसा भ्रष्‍टाचारात गेला, अधिकोषांच्‍या तिजोरीत राहिला, विकासाच्‍या कामांना रोखण्‍याची प्रवृत्ती राहिली, तर मुंबईचे भविष्‍य उज्‍ज्‍वल कसे रहाणार ? २१ व्‍या शतकात प्रगतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या महाराष्‍ट्रात हे कधीही स्‍वीकाराहर्र् नाही. मुंबईतील प्रत्‍येक नागरिकाच्‍या समस्‍येला ओळखून मी मोठ्या दायित्‍वाने सांगतो की, विकासामध्‍ये भाजप कधीही राजकारण आणत नाही. विकास आमच्‍यासाठी सर्वांत मोठी प्राथमिकता आहे. सर्वांच्‍या प्रयत्नांतून आम्‍ही मुंबईचा विकास करू. मी आपल्‍या समवेत उभा आहे.’’

मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्या कडून पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट 

सायंकाळी ५.१५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्‍यासपिठावर आगमन झाले. या वेळी व्‍यासपिठावर राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांसह महाराष्‍ट्रातील केंद्रीय आणि राज्‍याचे मंत्री, तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्‍थित होते.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठी संस्‍कृतीचे प्रतीक असणारा फेटा घातला, तर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांना मानवस्‍त्र दिले. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट दिला.

मोदी पुढे म्‍हणाले की,

१. मुंबई शहराला चांगले बनवण्‍यासाठी या विकासकामांची मोठी भूमिका असेल. स्‍वातंत्र्यानंतर प्रथम आज भारत मोठी स्‍वप्‍न पहाण्‍याचे आणि ती पूर्ण करण्‍याचा प्रयत्न करत आहे. जगामध्‍ये भारताविषयी आशावाद दिसत आहे.

२. भारत स्‍वत:च्‍या सामर्थ्‍याचा सदुपयोग करत असल्‍यामुळे भारताविषयी जगात सकारात्‍मकता निर्माण होत आहे. भारत जे करत आहे, ते समृद्धीसाठी आवश्‍यक आहे. स्‍वराज्‍य आणि सुराज्‍य यांची भावना छत्रपती शिवरायांमुळे मिळत आहे.

३. जगातील मोठ्या अर्थव्‍यवस्‍था मोडकळीस आल्‍या आहेत; मात्र भारत ८० कोटी जनतेला अन्‍नधान देत आहे. पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. विकसित भारताच्‍या संकल्‍पनेचे हे प्रतीक आहे. विकसित भारताच्‍या निर्माणामध्‍ये शहरांची भूमिका महत्त्वाची आहे.

५. येणार्‍या २५ वर्षांत भारतातील शहरे विकासात गती देईल. यासाठी मुंबईला सिद्ध देणे, ही सरकारची प्राथमिकता आहे. २०१४ मध्‍ये १०-१५ किलोमीटर मार्गावर मेट्रो होती. आता हे काम गतीने होत आहे.

६. देशात रेल्‍वेला आधुनिक करण्‍यासाठी ‘मिशन’ घेऊन काम केले जात आहे. याचा लाभ मुंबईतील लोकल रेल्‍वेलाही लाभ होईल. रेल्‍वेस्‍थानकांना विमानतळांप्रमाणे विकसित करण्‍यात येत आहे. काही वर्षांत मुंबईचा कायापालट होईल. सर्वांसाठी येथे रहाणे सुविधादायक होईल. आजूबाजूच्‍या जिल्‍ह्यांतून मुंबईत येणे सोपे होईल.

७. धारावीचा पुनर्विकास, तसेच जुन्‍या चाळींचा विकास होणार आहे. मुंबईच्‍या रस्‍त्‍यांना सुधारण्‍यासाठी जे काम चालू आहे. हे सरकारच्‍या विकासकामांचे प्रतिबिंब आहे.

८. प्रदूषण, स्‍वच्‍छता आदी शहरांच्‍या विविध समस्‍यांमध्‍ये समाधान शोधले जात आहे. इलेक्‍ट्रिक वाहतुकीसाठी आपण पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. शहरांमध्‍ये कचर्‍याच्‍या विल्‍हेवाट करण्‍याच्‍या समस्‍येला आपण नवीन तंत्रज्ञानाने सोडवणार आहोत.

९. नद्यांमध्‍ये दूषित पाणी सोडण्‍यात येऊ नये, यासाठी ‘वॉटर फिल्‍टर प्‍लान’ बसवणार आहोत.

१०. मुंबईचा पैसा तिजोरीत बंद राहिला, तर मुंबईचे भविष्‍य उज्‍ज्‍वल कसे रहाणार ? ही स्‍थिती २१ व्‍या शतकात स्‍वीकारहार्य नाही. भाजप विकासामध्‍ये राजकारण आणणार नाही. विकास आमची प्राथमिकता आहे.

मैदानाबाहेर उभारलेली कमान कोसळून पोलीस घायाळ !

बीकेसी मैदानावर सभास्‍थळी उभारण्‍यात आलेली एक कमान कोसळली. या वेळी कमानाच्‍या खाली पहार्‍यासाठी असलेल्‍या पोलिसांपैकी १ पोलीस घायाळ झाला. त्‍यांना उपचारासाठी रुग्‍णालयात नेण्‍यात आले.

येत्‍या अडीच वर्षांत मुंबईचा कायापालट करू ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

महाराष्‍ट्रातील ठप्‍प झालेल्‍या कामांना चालना देण्‍याची संधी पंतप्रधान मोदी यांच्‍या नेतृत्‍वामुळे आम्‍हाला मिळाली. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वामध्‍ये काही विशेष आहे, त्‍यामुळे आम्‍हाला ऊर्जा मिळते. येत्‍या अडीच वर्षांत मुंबईचा कायापालट झालेला दिसेल. महाराष्‍ट्रातील जनतेची अपेक्षा होती, की या विकासकामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते व्‍हावे. नवीन वर्षांच्‍या प्रारंभी विकासकामांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते होत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्‍हाळ्‍याचे नाते होते. हिंदुत्‍व हा दोघांमधील धागा होता. ३५० किलोमीटर रस्‍त्‍यांचे मेट्रोचे जाळे निर्माण झाल्‍यावर रस्‍त्‍यांवरील गर्दी न्‍यून होईल. विरोधकांना त्‍यांचे काम करू द्या, आम्‍ही आमचे काम करू. मुंबईत होणार्‍या क्राँक्रिटच्‍या रस्‍त्‍यांमुळे दुरुस्‍तीचे रुपये वाचतील. रस्‍ते खड्डेमुक्‍त होतील. केवळ ६ मासांत आम्‍ही विविध विकासकामे केली. त्‍यामुळे विरोधकांना त्रास होत आहे. जेवढी टीका कराल, त्‍याच्‍या दहापट आम्‍ही काम करू.

पंतप्रधानांच्‍या आशीर्वादामुळे मुंबईतील योजनांना गती मिळाली ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

विकासकामांचे उद़्‍घाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण !

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते मुंबई मेट्रोच्‍या ‘मार्ग २ अ’ आणि ‘मार्ग ७’ यांचे लोकार्पण करण्‍यात आले. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या २० दवाखान्‍यांचे लोकार्पण करण्‍यात आले. उपनगरांमध्‍ये रुग्‍णालयांच्‍या पुनर्विकासांच्‍या कामांचे उद़्‍घाटन आणि प्रसृतीगृहांच्‍या पुनर्निर्माणाचे भूमीपूजन झाले. मुंबईतील ४०० किलोमीटरच्‍या रस्‍त्‍यांच्‍या काँक्रिटीकरणाच्‍या कामाचेही भूमीपूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला अत्‍याधुनिक करण्‍याच्‍या कामाचा शिलान्‍यास या वेळी करण्‍यात आला. गुंदवली स्‍थानकात मोदींकडून ‘मेट्रोकार्ड अ‍ॅप’चे उद़्‍घाटन करण्‍यात आले. या वेळी त्‍यांनी मेट्रोमधून प्रवास केला.

लोकप्रियतेची स्‍पर्धा लागली, तर त्‍यामध्‍ये प्रथम क्रमांकावर मुंबई असेल, एवढे मुंबईचे पंतप्रधानांवर प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या आशीर्वादामुळे महाराष्‍ट्रात पुन्‍हा जनतेच्‍या मनातील सरकार आले. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात विकास योजना येत आहेत. कोरोनाच्‍या काळात केंद्र सरकारने पानटपरीवाले, पादचारी मार्गांवरील गरीब या सर्वांचा विचार करून स्‍व:निधीची व्‍यवस्‍था केली. मुंबईतील १ लाख ५० सहस्र फेरीवाल्‍यांना आमच्‍या सरकारने स्‍व:निधीचा लाभ दिला. २५ वर्षे ज्‍यांनी मुंबईवर सत्ता केली, त्‍यांनी स्‍वत:च्‍या ठेवी वाढवल्‍या; मात्र जनतेला सुविधा दिल्‍या नाहीत. मुंबईमध्‍ये ६ सहस्र कोटी रुपयांचे काँक्रीटचे रस्‍ते सिद्ध करण्‍यात येणार आहेत. ४० वर्षे खड्डे पडणार नाहीत, असे रस्‍ते आम्‍ही सिद्ध करू.

जगातील प्रमुख देशांच्‍या नेत्‍यांच्‍या मुखात पंतप्रधान मोदी यांचे नाव ! – मुख्‍यमंत्री

‘दावोस’ (स्‍वित्‍झर्लंड) मध्‍येही मोदी यांचा डंका होता, हा आपल्‍या देशाचा गौरव आहे. आपल्‍या देशातील पंतप्रधानांचे नाव जगातील प्रमुख देशातील नेत्‍यांच्‍या मुखात आहे. दावोसच्‍या दौर्‍यामध्‍ये जे उद्योग महाराष्‍ट्रात आले, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यामुळेच ! मुंबईचा चेहरा पालटायचा आहे. २५ वर्षांत झाले नाही, त्‍या कामांना आम्‍ही ६ मासांत गती दिली. पुढील ३ वर्षांत मुंबईचा कायापालट करण्‍याचा निर्धार आम्‍ही केला आहे.