संतसेवेची संधी देऊन सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले स्‍वभावदोष आणि अहं यांचा लय करून घेत असल्‍याची श्री. विजय लोटलीकर यांना आलेली अनुभूती

पौष कृष्‍ण चतुर्दशी (२०.१.२०२३) या दिवशी पू. (कै.) श्रीमती विजया लोटलीकर यांची द्वितीय पुण्‍यतिथी आहे. त्‍यानिमित्त त्‍यांचे पुत्र श्री. विजय लोटलीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांना त्‍यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनच्‍या ९९ व्‍या व्‍यष्‍टी संत पू. (कै.) श्रीमती विजया लोटलीकर यांच्‍या द्वितीय पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने श्री. विजय लोटलीकर यांना पू. (कै.) श्रीमती विजया लोटलीकर यांची सेवा करण्‍याची आणि नंतर इतर संतांची सेवा करण्‍याची संधी मिळाली. तेव्‍हा ‘संतसेवेतून ईश्‍वर स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून करून साधना करून घेत आहे’, याची त्‍यांना जाणीव झाली.

पू. (कै.) श्रीमती विजया लोटलीकर

१. आई (पू. (श्रीमती) विजया लोटलीकर)  पूर्ण झोपून असणे आणि त्‍यांची सेवा देहबुद्धी बाजूला ठेवून करावी लागणे

श्री. विजय लोटलीकर

‘एका सत्‍संगात परात्‍पर गुरु डॉ. आठवले मला म्‍हणाले, ‘‘आईची सेवा ईश्‍वरसेवा समजूून करा.’’ ते ऐकून मी मनात म्‍हणालो, ‘माझा ईश्‍वर म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉ. आठवलेच आहेत.’ तोच भाव मनात ठेवून मी पू. आईंची सेवा केली.

पू. आई स्नानगृहामध्‍ये पडल्‍यामुळे त्‍यांच्‍या हाताचे हाड मोडले होते. त्‍या दीड वर्ष अंथरुणावरच झोपून होत्‍या. त्‍यामुळे त्‍यांना अंघोळ घालणे, त्‍यांचे कपडे धुणे, त्‍यांना भरवणे, औषधे देणे, त्‍या सतत झोपून असल्‍यामुळे ‘त्‍यांच्‍या पाठीला जखमा होऊ नयेत’, यासाठी औषध लावणे इत्‍यादी सर्व सेवा कराव्‍या लागत. पू. आईंना बोलता येत नसल्‍यामुळे ‘त्‍यांना काय हवे आहे ?’, हे मला त्‍यांच्‍या हावभावावरून समजून घेऊन आणि देहबुद्धी बाजूला ठेवून सेवा कराव्‍या लागत. मला पू. आईंची सेवा करायला सौ. आर्या (सून) आणि सौ. संगीता (पत्नी, आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांनी साहाय्‍य केले. १०.२.२०२१ या दिवशी पू. आईंनी देहत्‍याग केला.

२. पू. (कै.) जनार्दन वागळेआजोबा (सनातनचे ६५ वे संत आणि माझे सासरे, वय १०० वर्षे) यांची केलेली सेवा !

२१.३.२०२१ या दिवशी पू. वागळेआजोबा (सनातनचे ६५ वे संत आणि माझे सासरे, वय १०० वर्षे) आमच्‍याकडे आले. त्‍यामुळे मला पू. वागळेआजोबा यांची सेवा करण्‍याची संधी मिळाली. ते चालते-फिरते होते; पण त्‍यांना अंघोळीसाठी पाणी काढून देणे, त्‍यांचे कपडे धुणे, त्‍यांना वेळेत अल्‍पाहार आणि जेवण देणे, फिरायला नेणे इत्‍यादी सेवा कराव्‍या लागत.

पू. (कै.) जनार्दन वागळे
पू. (कै.) जनार्दन वागळे

२ अ. पू. वागळेआजोबा यांची सेवा ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे स्‍मरण करून शरणागतीने केली, तरच ती त्‍यांना आवडते’, असे लक्षात येणे : पू. वागळेआजोबा आमच्‍याकडे आल्‍यावर पहिले काही दिवस त्‍यांचा वेळ जात नसे. तेव्‍हा त्‍यांना त्‍यांच्‍या गावाकडील (देवीहसोळ, राजापूर (रत्नागिरी) येथील) ओळखीच्‍या लोकांना भ्रमणभाष लावून देण्‍याची सेवा मला करावी लागायची. मी मनामध्‍ये ‘संतांची सेवा ईश्‍वराला (गुरुदेवांना) अपेक्षित अशी झाली पाहिजे’, असा विचार ठेवल्‍यामुळे मला सतत शरणागतीनेच सेवा करावी लागे. मी माझ्‍या मनाने त्‍यांची काही सेवा केली, तर त्‍यात काहीतरी चुका व्‍हायच्‍या आणि त्‍यांना ती आवडायची नाही; पण ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे स्‍मरण करून सेवा केली, तर ती सेवा मनापासून होते आणि त्‍यांना आवडते’, असे माझ्‍या लक्षात आले.

 ३. पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका (सनातनचे १८ वे समष्‍टी संत, वय ९२ वर्षे) यांच्‍या आजारपणात त्‍यांची पूर्ण सेवा करावी लागणे

पू. चत्तरसिंग इंगळे

मूळचे दुर्ग, छत्तीसगड येथील पू. इंगळेकाका (सनातनचे १८ वे समष्‍टी संत, वर्ष ९२ वर्षे) अन् मी पूर्वी परात्‍पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांच्‍या समवेत प्रसारसेवेला होतो. पू. इंगळेकाका गोव्‍यात वास्‍तव्‍याला असतांना त्‍यांच्‍या एका पायाचे हाड मोडल्‍यामुळे त्‍यांना काहीच करता येत नव्‍हते. मला त्‍यांची सेवा करण्‍यासाठी विचारल्‍यावर मी लगेच होकार दिला. आता त्‍यांना ऐकायला न्‍यून येत असून त्‍यांची दृष्‍टीही अल्‍प झाली आहे. ते पूर्णपणे अंथरुणावर झोपून असल्‍यामुळे मला त्‍यांची सर्व सेवा करावी लागणार होती. ही सेवा करतांना मी ठरवले होते, ‘या सेवेतून मन, बुद्धी आणि अहं यांचा लय करण्‍याचा प्रयत्न करायचा आहे.’

३ अ. पू. इंगळेकाकांमधील अनुभवलेली प्रीती !

१. पू. काकांना कोणी भेटायला आले, तर ते त्‍यांचे स्‍वागत अगदी आनंदाने करतात आणि आम्‍हाला (मी आणि श्री. विजय बेंद्रे यांना) त्‍यांना चहा देण्‍यास सांगत. त्‍यांची सांगण्‍याची पद्धत अतिशय नम्रपणाची होती.

२. एकदा आम्‍ही पू. काकांना म्‍हणालो, ‘‘काका, तुम्‍ही आमच्‍यावर रागावला आहात का ?’’ तेव्‍हा ते आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘मी तुमच्‍यावर कसा रागावेन ? मी तुमच्‍यातील स्‍वभावदोषांवर रागावतो.’’

३ आ. पू. इंगळेकाकांची सेवा करतांना झालेले लाभ !

१. पू. काकांची सेवा करतांना माझ्‍या प्रार्थना आणि कृतज्ञता यांत वाढ झाली.

२. त्‍यांना जेवण भरवतांना ‘ते नामजप ऐकत जेवावेत’, यांसाठी मी मोठ्याने नामजप करतो. त्‍यामुळे माझा नामजप वाढण्‍यास साहाय्‍य झाले.

३ इ. पू. इंगळेकाकांचा परात्‍पर गुरुदेवांप्रती असलेला अपार भाव !

१. एकदा संध्‍याकाळी ५.३० च्‍या सुमारास मी पू. काकांना म्‍हणालो, ‘‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तुमच्‍यासाठी डाळिंब पाठवले आहे. त्‍याचा रस काढून देऊ का ?’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘गुरुदेव किती काळजी घेतात ना !’’

२. एकदा मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंनी तुमच्‍यासाठी खीर पाठवली आहे. ती देऊ का ?’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘ते आपल्‍यासाठी एवढे करतात, तर ‘नको’ म्‍हणून कसे चालेल.’’

३. मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘पू. काका, आम्‍ही तुमची ‘तुम्‍ही परात्‍पर गुरु डॉक्‍टर आहात’, या भावाने सेवा करतो.’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘त्‍यांच्‍यासारखा दुसरा कोणी होऊच शकत नाही ! कळले का तुला ?’’

४. त्‍यांची गुरुदेवांवर इतकी श्रद्धा आहे की, ‘गुरुदेवांचे नाव काढले, तरी त्‍यांचे हात जोडले जातात.’

३ ई. पू. इंगळेकाकांच्‍या सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे

१. साधक स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया करूनही (स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून करण्‍यासाठी प्रतिदिन करत असलेले प्रयत्न) त्‍यांचे स्‍वभावदोष न्‍यून होण्‍यास वेळ लागतो; पण ‘संतसेवेतून स्‍वभावदोष लवकर न्‍यून होतात’, असे माझ्‍या लक्षात आले.

२. संतांची सेवा करतांना पावलोपावली मनोलय होऊन सेवा करणार्‍याची स्‍वीकारण्‍याची वृत्ती वाढते. तिथे साधक त्‍याच्‍या मनाप्रमाणे काहीच करू शकत नाही. देवाच्‍या इच्‍छेप्रमाणे सेवा करतांना कृतीत शरणागती येते आणि शरणागतभावाने सेवा केल्‍यावर साधकांची प्रगती होते.

या सेवांमधून ‘संतांची सेवा त्‍यांचे वय आणि प्रकृती यांनुसार करावी लागते. संतांना अपेक्षित अशी सेवा झाल्‍यावर आपल्‍याला आनंदच मिळतो’, असे माझ्‍या लक्षात आले.

‘या सेवेतून स्‍वभावदोष घालवून प्रगती करण्‍यासाठीच देवाने मला ही संधी दिली आहे. गुरुदेव आपल्‍यासाठी पुष्‍कळ काही करत असून माझी प्रगती होण्‍यासाठी देव असे प्रसंग निर्माण करत आहेे’, असे माझ्‍या लक्षात आले.’

– श्री. विजय लोटलीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७० वर्षे ), फोंडा, गोवा. (७.९.२०२२)

(हे लिखाण पू. इंगळेकाका यांच्‍या देहत्‍यागाच्‍या पूर्वीचे असल्‍याने त्‍यात कोणताही पालट केलेला नाही.)

बाहेरगावी असतांना अकस्‍मात् ‘अ‍ॅन्‍जिओप्‍लास्‍टी’ करायचे ठरल्‍यावर श्री. विजय लोटलीकर यांना देवाने केलेले साहाय्‍य !

‘एकदा पू. वागळेआजोबा रुग्‍णालयात असतांना मी त्‍यांना भेटण्‍यासाठी आणि त्‍यांची सेवा करण्‍यासाठी रत्नागिरी येथे गेलो होतो. तेथील आधुनिक वैद्य माझे चुलत चुलत भाऊ आहेत. मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘एकदा मला सर्व वैद्यकीय चाचण्‍या करून घ्‍यायच्‍या आहेत.’’ तेव्‍हा ते मला म्‍हणाले, ‘‘करून घे.’’

१. आधुनिक वैद्यांनी तपासणी  केल्‍यावर ‘अ‍ॅन्‍जिओप्‍लास्‍टी’ करावी लागेल’, असे सांगणे, तेव्‍हा दुसर्‍या गावी असल्‍यामुळे ‘कसे करावे ?’, असा प्रश्‍न निर्माण होणे

माझ्‍या सर्व चाचण्‍या झाल्‍यावर आधुनिक वैद्य असलेले माझे भाऊ मला म्‍हणाले, ‘‘आता सर्व केलेस. आता ‘इको’ करून घे.’’ ‘इको’ केल्‍यावर त्‍यांच्‍या सांगण्‍यावरून ‘अ‍ॅन्‍जिओग्राफी’ केली. त्‍यात त्‍यांना माझी नस दबलेली दिसली; म्‍हणून ते मला म्‍हणाले, ‘‘तुला ‘अ‍ॅन्‍जिओप्‍लास्‍टी’ करावी लागेल.’’ तेव्‍हा माझ्‍या मनात विचार आला, ‘आता माझ्‍याजवळ कोणी नाही आणि पैशांचे कसे करायचे ?  मी इकडे रत्नागिरीत आलो आहे आणि अमेय (मुलगा) गोव्‍यात आहे.’

२. अकस्‍मात् निर्माण झालेल्‍या परिस्‍थितीत देवाने केलेले साहाय्‍य !

मी अमेयला भ्रमणभाष केल्‍यावर त्‍याने मला विचारले, ‘‘तुम्‍ही कुठे आहात ?’’ मी त्‍याला म्‍हणालो, ‘‘मी रत्नागिरीत रुग्‍णालयात आहे. आधुनिक वैद्य मला निर्णय विचारत आहेत.’’ तेव्‍हा आधुनिक वैद्य असलेले माझे भाऊ मला म्‍हणाले, ‘‘तू काळजी करू नकोस. केवळ तुझे रेशन कार्ड आणि आधार कार्ड मागव.’’

२ अ. २०.९.२०२१ या दिवशी ‘महात्‍मा फुले मदत योजने’तून माझी ‘अ‍ॅन्‍जिओप्‍लास्‍टी’ झाली.

‘प्रसंग निर्माण करणारा, त्‍यात स्‍थिर ठेवणारा आणि त्‍यातून बाहेर काढणाराही तोच (देव, म्‍हणजेच परात्‍पर गुरुदेव) आहे. चराचरात ईश्‍वर असून तो आपल्‍याला साहाय्‍य करत असतो. आपली शरणागती वाढली, तर आपल्‍याला साहाय्‍य मिळते. केवळ आपली पहाण्‍याची दृष्‍टी पाहिजे’, असे या प्रसंगातून माझ्‍या लक्षात आले.

३. कृतज्ञता

‘देवा, तुम्‍ही माझी किती काळजी घेतलीत ? नाहीतर आता मला २ – ३ लाख रुपये व्‍यय करावे लागले असते. देवच सर्व करतो आणि भक्‍तांची काळजी घेतो. ‘ईश्‍वर (गुरुदेव) कसे साहाय्‍य करतो ?’, हे माझ्‍या लक्षात येऊन माझ्‍याकडून त्‍याच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

– श्री. विजय लोटलीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७० वर्षे)  फोंडा, गोवा. (७.९.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक