‘२९.६.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ८१ टक्के असून ते सद़्गुरु पदावर विराजमान झाले आहेत’, असे एका सोहळ्याच्या माध्यमातून घोषित करण्यात आले. या आध्यात्मिक सोहळ्याचे देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे. १७.१.२०२३ या दिवशी सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/646053.html
६. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हृदयस्थानी श्रीरामस्वरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन त्यांनीच पू. नीलेश सिंगबाळ सद़्गुरुपदी विराजमान होण्याची घोषणा केल्याचे जाणवणे
‘सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी वाराणसी आश्रमाच्या संदर्भात मनोगत व्यक्त केल्यानंतर सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात सांगणे चालू केले. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे बोलत असतांना मला त्यांच्या हृदयस्थानी श्रीरामस्वरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्याच वेळी सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घोषित केले, ‘पू. नीलेश सिंगबाळ आज सद़्गुरु नीलेश सिंगबाळ झाले आहेत.’ यांतून ‘अपार कृतज्ञताभावामुळे सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे काही काळासाठी पूर्णपणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूप झाले होते. यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हृदयस्थानी आरूढ असलेल्या श्रीरामस्वरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच पू. नीलेश सिंगबाळ सद़्गुरुपदी विराजमान होण्याची आनंदवार्ता समष्टीत घोषित केली’, असे मला जाणवले.
७. सोहळ्यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ वाचन करत असतांना ईश्वराने सूक्ष्मातून सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांची इच्छा, क्रिया आणि ज्ञान ते निर्गुण अशी साधनायात्रा दाखवणे
सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांची ८१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे गुपित उलगडले. त्यानंतर सोहळ्यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केले. हे वाचन होतांना मला सूक्ष्मातून ईश्वराने, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांची साधनायात्रा कशी करवली ?’, ती प्रक्रिया दाखवली. ईश्वराने सांगितले, ‘शिष्याची जशी प्रकृती असते, तसे गुरु त्याला लाभतात. अधिकतर संत एका जन्मात इच्छाशक्ती, क्रियाशक्ती किंवा ज्ञानशक्ती यांपैकी एका स्तराची साधना करतात आणि पुढच्या स्तराच्या साधनेसाठी पुन्हा जन्म घेतात. याउलट काही ठराविक समष्टी संतांमध्येच इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्ही स्तरांची साधना करण्याची क्षमता असते. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ त्यांपैकी एक आहेत. ईश्वराने त्यांना वाराणसी आश्रमात सेवा देऊन त्यांची इच्छाशक्तीच्या स्तराची साधना करवून घेतली. पुढे धर्मप्रसाराच्या अन् हिंदु संघटनाच्या सेवेच्या माध्यमातून क्रियाशक्तीच्या स्तराची, तर कोरोना काळात चालू झालेल्या ऑनलाईन सत्संगात समष्टीला मार्गदर्शन करण्याच्या माध्यमातून ईश्वराने त्यांची ज्ञानशक्तीच्या स्तराची साधना करवून घेतली. आजच्या सन्मान सोहळ्यानंतर आता त्यांची निर्गुणाकडे वाटचाल होणे चालू होणार आहे. ‘गुरु जे मार्गदर्शन करतात, त्याचे आदर्श शिष्य म्हणून पालन केल्यावर एकाच जन्मात किती शीघ्र गतीने प्रगती होऊ शकते’, याचे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ हे मूर्तीमंत उदाहरण आहेत. याच प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना वेळोवेळी साधनेच्या संदर्भात करत असलेल्या मार्गदर्शनाचे मोलही यांतून लक्षात येते.’
८. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु सिंगबाळ यांचा सन्मान केल्यावर त्यांच्यातील शिवतत्त्वाचे पूर्णत्व होऊन त्यांच्या सहस्रारचक्रातून शक्ती प्रक्षेपित होणे
सोहळ्यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन पूर्ण झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु सिंगबाळ यांचा हार घालून सन्मान केला. त्या वेळी सद़्गुरु सिंगबाळ यांच्यातील शिवतत्त्वाचे पूर्णत्व होऊन त्यांच्या सहस्रारचक्रातून शक्ती प्रक्षेपित झाली.
कलियुगात एखाद्या संतांमध्ये अधिकाधिक ३ टक्के विशिष्ट देवतेचे तत्त्व कार्यरत असते. सन्मान होण्यापूर्वी सद़्गुरु सिंगबाळ यांच्यातील शिवतत्त्वाचे प्रमाण २ टक्के होते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी केलेल्या सन्मानामुळे त्यांच्यातील शिवतत्त्वात वाढ होऊन ते ३ टक्के झाले, म्हणजेच सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्यातील शिवतत्त्व पूर्ण झाले.
८ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु सिंगबाळ यांचा सन्मान केल्यावर निर्गुण तत्त्व कार्यरत होणे : सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान होण्यापूर्वी वातावरणात आकाशतत्त्व कार्यरत होते. याउलट श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु सिंगबाळ यांचा सन्मान केल्यावर वातावरणात निर्गुण तत्त्व कार्यरत झाले.
८ आ. ‘शक्तीविना शिव शव असणे’; म्हणून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माता पार्वतीच्या रूपात सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान करणे आणि त्यामुळे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ शिवाच्या रूपात दिसणे : सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान होत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे सूक्ष्म रूप माता पार्वतीचे, तर सद़्गुरु सिंगबाळ यांचे रूप शिवाप्रमाणे झाले होते. या वेळी ‘माता पार्वतीच भगवान शिवाचा सन्मान करत आहे’, असे मला जाणवत होते. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘आद्य शंकराचार्य यांची अनुभूती होती, ‘शक्तीविना शिव शव असतो.’ यामुळे सद़्गुरुपद गाठून शिवस्वरूप झालेल्या सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान स्वतः देवीस्वरूप शक्तीस्वरूपिणी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या हस्ते करण्याचे ईश्वरी नियोजन आहे.’
८ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी केलेल्या सन्मानामुळे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांची सर्व कुंडलिनीचक्रे कार्यरत होऊन त्यांच्या सहस्रारचक्रातून पांढर्या रंगाचे चैतन्य प्रक्षेपित होणे : ज्या प्रकारे भगवान शिवाच्या जटेतून सतत शुभ्र (श्वेत) गंगा सतत प्रवाहित होत असते, त्या प्रकारे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी केलेल्या सन्मानामुळे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांची सर्व कुंडलिनीचक्रे कार्यरत होऊन त्यांच्या सहस्रारचक्रातून पांढर्या रंगाचे चैतन्य प्रक्षेपित होत होते. ‘सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या सहस्रारचक्रातून प्रक्षेपित होणारे चैतन्य हे त्यांची निर्गुणाकडे होणारी वाटचाल आणि त्यांच्याकडून भविष्यात होणार्या समष्टी कार्याचे प्रतीक आहे’, असे जाणवले.’ (क्रमशः)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२२, रात्री १०.३०)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/646488.html
|