पुणे शहराच्‍या नामांतराची आवश्‍यकता नाही ! – ब्राह्मण महासंघ

पुणे – शहराचे नामकरण जिजाऊनगर व्‍हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड पाठोपाठ राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. ‘महाराष्‍ट्रातील सर्व शिवभक्‍तांची अशी इच्‍छा असून येणार्‍या अधिवेशनात नामांतराच्‍या संदर्भात सरकारकडे मागणी करणार’, असे मिटकरी यांनी म्‍हटले आहे. ‘पुणे विद्यापिठाला जसे ‘सावित्रीबाई फुले’, असे नाव दिले, याच धर्तीवर पुणे शहराचे ‘जिजाऊनगर’ किंवा ‘जिजापूर पुणे’ असे नामांतर मुख्‍यमंत्री किंवा उपमुख्‍यमंत्री यांनी करावे’, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केली होती.

या नामांतराच्‍या वादात आता ब्राह्मण महासंघानेही उडी घेतली आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी नामांतराच्‍या मागणीला विरोध करत ‘पुण्‍याच्‍या नामांतराची आवश्‍यकता नाही’, असे म्‍हटले आहे. राजमाता जिजाऊ या सर्वांनाच वंदनीय आहेत. त्‍यांचे भव्‍य आणि वेगळे स्‍मारक लाल महाल येथे उभारा. पुण्‍याला पुण्‍येश्‍वर महादेवामुळे ‘पुणे’, असे नाव पडले आहे, असे त्‍यांनी सांगितले.