‘नदी ही नेहमी प्रदूषणमुक्त असावी, तिचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे’, असे प्रत्येकाला वाटते. हाच उद्देश साध्य करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सध्या एक अतिशय उत्कृष्ट आणि आशादायी उपक्रम राबवला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’, या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ७५ नद्यांवर ‘नदी संवाद’ यात्रा काढण्यात येत आहे. नद्यांमध्ये असलेल्या गाळामुळे त्यांची वहन, साठवण क्षमता न्यून होणे, असे गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर नदीच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी या अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.
या अभियानामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कासाळगंगा, भीमा, कोरडा, आदिला, दुबदुबी आणि माणगंगा नद्यांचा समावेश आहे. या नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सांगितले. ‘नद्यांना प्रदूषित करणारी स्थळे निश्चित करा. दोषींना नोटिसा द्याव्यात’, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून नदी प्रदूषित होत आहे, नदी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे, हे प्रशासनाच्या लक्षात येत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याचसमवेत नदी प्रदूषणमुक्त रहावी यासाठी नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडणारे कारखाने आणि आस्थापने यांवर वेळीच कारवाई केली असती, तर आज हा उपक्रम राबवून जागृती करण्याची वेळ प्रशासनावर आली नसती. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण करणार्यांना पाठीशी न घालता त्यांनाही कठोर दंड ठोठावणे आवश्यक आहे.
काही मूलभूत आवश्यकतांसाठी भगवंताने ‘नदी’ची व्युत्पत्ती करून मानवावर अपार कृपा केली आहे. त्याची जाणीव ठेवून नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. नद्यांचे आरोग्य चांगले, तरच आपले आरोग्य चांगले ! त्यामुळे या उपक्रमात प्रशासनासह लोकसहभागाचीही आवश्यकता आहे. प्रत्येकाने नदी प्रदूषणमुक्त रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘चला जाणूया नदीला’, या अभियानात सहभागी असलेल्या प्रत्येक विभागाने उपक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, तसेच नद्यांची सुरक्षितता यापुढेही कायम रहाण्यासाठी तशी उपाययोजना काढणे अनिवार्य आहे. तरच हे अभियान यशस्वी होईल. नाहीतर येरे माझ्या मागल्या …!
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर