‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

 देहलीतील ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’तील मागणी 

देहली – झारखंडच्‍या सरकारने जैन समाजाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत पवित्र तीर्थस्‍थळ असलेल्‍या ‘सम्‍मेद शिखरजी’ला व्‍यावसायिक दृष्‍टीने पर्यटनस्‍थळ म्‍हणून विकसित करण्‍याचा निर्णय घेतला होता. या संदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारने वर्ष २०१९ मध्‍ये काढली होती. त्‍यातील काही तरतुदी परत घेतल्‍याने झारखंड सरकारचे धार्मिक स्‍थळाला पर्यटनस्‍थळ बनवण्‍याचे षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त झाले. यासाठी आम्‍ही केंद्र सरकारचे अभिनंदन करतो. यासमवेतच धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी, अशी मागणी देहलीतील जंतरमंतर येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. या आंदोलनामध्‍ये अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

या आंदोलनामध्‍ये ‘पाकिस्‍तानमधील हिंदूंच्‍या निर्घृण हत्‍यांच्‍या विरोधात आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर आवाज उठवण्‍यात यावा’, अशीही मागणी या वेळी करण्‍यात आली. या वेळी समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी संबोधित केले.

धार्मिक स्‍थळे अथवा मंदिरे ही काही पर्यटनस्‍थळे नव्‍हेत ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सध्‍या देशात धार्मिक पर्यटनाच्‍या नावाखाली देशात एक चुकीची विदेशी धारणा रुजवली जात आहे. पर्यटन म्‍हणजे सुट्टीला मौजमजा करण्‍यासाठी लोक जातात. त्‍याचा आणि धर्माचा काही संबंध नसतो. पर्यटन हे भौतिक सुखाशी निगडित आहे. धार्मिक स्‍थळे, मंदिरे ही काही पर्यटनस्‍थळे नव्‍हेत. ती तीर्थक्षेत्र आहेत आणि तेथे येणारे लोक भाविक, भावभक्‍ती असणारे, साधना अन् मोक्षप्राप्‍तीच्‍या आशेने येणारे आहेत.